पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढीचा आलेख पाहून नेहरू नगर येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती संबंधित प्रशासनाने केली होती. मात्र, काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून जम्बो कोविड सेंटरकडे रुग्ण भरतीचा ओघ कमी झाल्याने दिवसरात्र अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या ३२ नर्सेस आणि वॉर्डबॉय यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, ३० हजार पगार देऊ असे नर्सेसना सांगण्यात आले. मात्र, प्रत्येक्षात केवळ ४ ते ५ तर काही जणींना २ हजार रुपये दिल्याचं कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्स सिंधू वासमवार यांनी लोकसत्ता.कॉम शी बोलताना सांगितले आहे. तर, सदर घटनेची माहिती घेऊन चौकशी करू आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.
सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणू ने थैमान घातले होते. त्यानुसार रुग्ण वाढीचा आलेख पाहून महानगर पालिकेने पिंपरी च्या नेहरू नगर येथे अण्णा साहेब मगर स्टेडियमवर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन सोहळा पार पडला होता. दरम्यान, कोविड सेंटरमुळे शेकडो जणांना कंत्राटी काम मिळालं होतं. नर्सेस, वार्डबॉय यांना कामावर रुजू करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात विदर्भातील ३२ नर्स आणि वार्डबॉय यांना जम्बो कोविड सेंटरमध्ये सागर तरडे नावाच्या व्यक्तीच्या मध्यस्तीने कंत्राटी पद्धतीवर ३० हजारांच्या पगारावर कामावर रुजू करण्यात आले होते. त्यांना तीन महिन्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
एक महिनाभर नर्स आणि वॉर्ड बॉय यांनी अतिदक्षता विभागात जीवाची पर्वा न करता १२ तास पीपीइ किट घालून काम केले. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्ण बरे होत असून रुग्णांचे प्रमाण ओसरत आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्ण भरती होण्याचे प्रमान कमी झाले असून ३२ नर्स आणि वॉर्डबॉय यांना तडकफडकी नोकरी वरून काढत घरचा रस्ता दाखवला आहे. संबंधित ३२ नर्स आणि वॉर्ड बॉय यांना ३० हजार पगार देतो सांगून केवळ ४ ते ५ हजार देण्यात आले आहेत. तर, काहींना २ हजार दिले असल्याचं नर्स सिंधू यांनी सांगितले आहे. तर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचारी वर्गाला न्याय मिळवून देऊ असे सांगितले आहे. त्यांनी सर्वांची भेट घेऊन त्यांचं मनोधैर्य वाढवलं आहे.
तात्पुरत्या राहात असलेल्या ठिकाणची तीन दिवस मुदत!
संबंधित ३२ नर्स आणि वार्डबॉय यांची तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केली होती. परंतु, नोकरीवरून काढल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने त्यांना तीन दिवसांची मुदत दिली असून तुम्ही इथून निघून जा असे सांगितले आहे. प्रत्येक्षात पूर्ण पगार न मिळाल्याने नर्स आणि इतरांना अडचणी येत आहेत अस त्यांनी सांगितलं आहे.
