करोनाच्या महासंकटामुळे यंदा पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मान या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाच देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी या मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना शहरातील मान्यवरांच्या हस्ते केली जात असे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी म्हणाले, “दरवर्षी समाजातील विविध मान्यवर व्यक्तींच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. मात्र, यंदा करोनाचे सावट पाहता गणेश मंडळांच्याच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. या आठ गणेश मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणरायाची विधीवत पूजा करणार आहेत.” यंदा करोनाच्या संकटामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन घेतला आहे.

आणखी वाचा- पुणेकरांनो यंदा असा साजरा करा गणेशोत्सव

कोणत्या गणपतीची प्रतिष्ठापना कोणाच्या हस्ते होणार?

कसबा गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते, तर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते, तर अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच गुरुजी तालीम मंडळाची प्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते होणार असून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल. त्याचबरोबर तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना केसरीवाडा गणपतीचे डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते तर केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना आणि आरती तुळशीबाग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

यंदा सर्व मंडळांनी भाविकांना ऑनलाइन गणरायाचे दर्शन घेण्याची व्यवस्था केली असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे भाविकांनी या सेवाचा लाभ घ्यावा आणि रस्त्यावर येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year the installation of main ganapati mandals idol in pune by the office bearers for the first time in 128 years aau 85 svk
First published on: 18-08-2020 at 13:46 IST