मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सक्रिय होण्याबाबत कडक शब्दात सूचना दिल्या, काहींची चांगलीच हजेरी घेतली. असेच काम केलेत, तर तुम्हाला बदलावे लागेल असाही दम दिला. मला रिझल्ट दिसले पाहिजेत आणि मी जे सांगतोय त्याचे गांभीर्य नीट लक्षात घ्या हेही त्यांनी सांगितले. एकुणात सगळी झाडाझडती बैठकीत झाली.
अशीच बैठक त्यांनी यापूर्वीही पुण्यात येऊन घेतली होती. त्या वेळी पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. त्या बैठकीचेही वर्णन बैठकीनंतर झाडाझडती असेच करण्यात आले होते. पुण्यात शुक्रवारच्या बैठकीसाठी जशी उत्सुकता निर्माण झाली होती, तशीच उत्सुकता त्या बैठकीबाबतही शहरात झाली होती आणि शुक्रवारी ज्या पद्धतीचा भाषणवजा संवाद राज ठाकरे यांनी उपस्थितांबरोबर साधला तसाच संवाद त्या बैठकीतही झाला होता.
पुण्यातील या दोन्ही झाडाझडती बैठकांमध्ये राज यांची भाषणे झाली ती अशी..
पक्ष बैठक, स्थळ: पीवायसी जिमखाना
तुम्ही सर्व जण मनसे म्हणून निवडून आला आहात. मनसेकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. तुमचे काम दिसले पाहिजे आणि ते लोकांपर्यंतही पोहोचले पाहिजे. मला पक्षात गटबाजी चालणार नाही. तुम्ही सर्वानी महापालिकेत एकजुटीने काम केले पाहिजे. मनसेची एकत्र ताकद तिथे दिसली पाहिजे.ज्यांना बाहेर जायचे असेल त्यांनी आताच जा; पण पक्षसंघटनेबाबत जे मी सांगेन त्या पद्धतीनेच काम झाले पाहिजे. मला काम दिसले नाही तर मला तुमच्याबाबत निर्णय करावा लागेल.
पक्ष बैठक, स्थळ: दरोडे सभागृह
प्रत्येक हजारी यादीसाठी किमान तीनजण (गट अध्यक्ष) नियुक्त झालेच पाहिजेत. ते ज्या मतदारसंघात झाले नसतील, तेथे हे काम पंधरवडय़ात पूर्ण झाले पाहिजे. राज्यात चार पक्षांचा विरोध पत्करून मी एक पक्ष चालवतोय. लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करायच्या आणि निवडणुका जिंकायच्या, तर जनतेला आपले चांगले काम दाखवावे लागेल. मला आता रिझल्ट पाहिजे. पुढच्या पंधरवडय़ात सर्व गट अध्यक्ष नियुक्त झालेच पाहिजेत. मी जे म्हणतोय त्याचा सिरिसयनेस तुम्हाला कळतोय का नाही? निवडणुका जिंकायच्या, तर गट अध्यक्षांची अतिशय गरज आहे. त्यांचे महत्त्व नीट लक्षात घ्या. जिथे गट अध्यक्ष नियुक्त करण्यात आलेले नाहीत, तेथील पदाधिकारी काम करत नाहीत असे समजायचे का? दिलेले काम तुम्हाला जमत नसेल, तुम्ही ते करू शकत नसाल, तर मला वेगळे पदाधिकारी नेमावे लागतील. ते माझ्याकडे तयार आहेत.