पुणे : आषाढ महिन्यातील शेवटचा दिवशी सामिष खवय्यांनी हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारुन रविवारी ‘गटारी अमावस्या‘ केली. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी पुणे, मुंबई, ठाण्यातील बाजारात खवय्यांची गर्दी झाली होती. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवशी दीप अमावस्या असते. दीप अमावस्येला बोली भाषेत गटारी अमावस्या असे म्हटले जाते. यंदा आषाढ महिन्याची सांगता सोमवारी (१७ जुलै) होणार आहे. सोमवती अमावस्येला शक्यतो खवय्ये सामिष पदार्थ निषिद्ध मानतात. यंदा आधिक मास असून आधिक मासाची सुरुवात मंगळवारी (१८ जुलै) होणार आहे. अधिक मास आणि त्यानंतर येणाऱ्या श्रावण मासात सामिष पदार्थ वर्ज्य मानले जातात.
अनेकजण नवरात्रोत्सवानंतर सामिष पदार्थांचे सेवन करतात. पुढील अडीच महिने सामिष पदार्थ वर्ज्य असल्याने खवय्यांची रविवारी चिकन, मटण, मासळीवर ताव मारला. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी सकाळपासून दुकानांसमोर रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. गणेश पेठेतील मासळी बाजारात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. पापलेट, सुरमईसह ओले बोंबिल, कोळंबी, हलवा या मासळींना चांगली मागणी होती. पापलेट, सुरमईचे दर तेजीत होते. मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी २० ते २५ टन, खाडीतील मासळी ३०० किलो, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन मासळीची एकूण मिळून १५ ते २० टन, तसेच नदीतील मासळीची ५०० ते ७०० किलो अशी आवक झाली, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
हेही वाचा >>> आमदार रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
ग्राहकांकडून मटणाला चांगली मागणी होती. हाॅटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून मटणाला मागणी होती, असे पुणे शहर मटण दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. चिकनच्या मागणीत मोठी वाढ झाली, असे पुणे शहर बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.
मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर
मटण- ७४० रुपये
चिकन- २२० ते २३० रुपये किलो
पापलेट- १००० ते १५०० रुपये
सुरमई- ९०० ते १००० रुपये
कोळंबी- ३०० ते ७०० रुपये
ओले बोंबिल- ३०० ते ७०० रुपये
गटारी साजरी करण्यासाठी लोणावळ्यात गर्दी
आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाली होती. पुणे, मुंबईतील पर्यटक गटारी साजरी करण्यासाठी सकाळपासून लोणावळ्यात दाखल झाले होते. भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी झाली होती. पर्यटकांची गर्दी, कोंडी सोडविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ आणि पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वयंसेवक, गृहरक्षक दलातील जवानांची नेमणूक करण्यात आली होती.
