scorecardresearch

गुप्तधनासाठी तीन वर्षीय मुलीचे अपहरण; अमावस्येच्या दिवशी देणार होते नरबळी

या प्रकरणी एका कुटुंबाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गुप्तधनासाठी तीन वर्षीय मुलीचे अपहरण; अमावस्येच्या दिवशी देणार होते नरबळी

तीन वर्षीय मुलीचा नरबळी दिल्यास गुप्तधन मिळेल या आशेने चिखलीतील मुलीचं अपहरण करणाऱ्या एका कुटुंबाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपहरणाचा नाट्यातून तीन वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी विमल संतोष चौगुले, संतोष मनोहर चौगुले, सुनीता अशोक नलावडे, निकिता अशोक नलावडे यांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांनी अमावस्या असून त्या दिवशी तुम्ही तीन वर्षीय मुलीचा नरबळी दिल्यास तुम्हाला गुप्त धन मिळेल अशी बतावणी एका भोंदू बाबाने केल्याने जुन्नर येथील चौगुले कुटुंब लहान मुलीच्या शोधात होतं. याबाबतची माहिती चिखली परिसरात राहणाऱ्या बहिणीला विमलने दिली. तेव्हा कर्नाटक येथील कुटुंब शेजारी राहात असून त्यांना चार मुली आहेत. पैकी एक मुलगी चिखलीत राहात असल्याचं सांगितलं. त्यानुसार त्यांनी त्या मुलीचं अपहरण करण्याचा कट रचला, यात बहीण देखील सहभागी झाली. चौगुले कुटुंब बहिणीच्या घरी राहण्यास गेलं. तिथं तीन वर्षीय मुलीला जवळ करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आरोपीचा अल्पवयीन मुलगा त्या मुलीला चॉकलेट, आईस्क्रिम द्यायचा त्यामुळं ती मुलगी आरोपी विमलच्या मुलाकडे येत असत. दरम्यान, स्वतः वर संशय येऊ नये म्हणून विमल एक दिवस अगोदरच जुन्नरला गेल्याचे भासवले गेले, पण प्रत्यक्षात ती चिखलीतच राहात होती.

…अन् मुलीला घेऊन विमलने जुन्नर गाठलं –

काल (शनिवार) दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगा तीन वर्षीय मुलीला घेऊन बाहेर आला. तिला चॉकलेट दिलं आणि आरोपी विमलकडे सोपवलं, तिथून त्या मुलीला घेऊन विमलने जुन्नर गाठलं. दरम्यान, तीन वर्षीय मुलीचं अपहरण झालं म्हणून शेख कुटुंब चिंतेत होत. त्यांनी याबाबत चिखली पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् सीसीटीव्ही तपासणी सुरू केली –

तीन वर्षीय मुलीच अपहरण झाल्याने, घटनेच गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हे शाखा, गुंडा स्कॉड, दरोडा, अंमली, खंडणी विरोधी पथक, इतर पोलीस अधिकारी यांना शोध घेण्यासाठी सक्त आदेश दिले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन सीसीटीव्ही तपासण्यास सुरू केलं. तेव्हा आरोपी विमलचा अल्पवयीन मुलगा तीन वर्षीय मुलीला घेऊन जात असल्याच पुढे आलं. आणखी सीसीटीव्ही तपासले असता तिथं त्याची आई आणि तो दिसला. तीन वर्षीय मुलीला घेऊन गेल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर जुन्नर येथून तातडीने तीन वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आहे. अवघ्या दहा तासात गुन्ह्याचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या