लोकरीचे क्रोशा पद्धतीचे वीणकाम करणाऱ्या महिलांनी पाच हजार ब्लँकेट्स 4croshe1एकत्र करून जगातील सर्वात मोठे ब्लँकेट तयार करण्याच्या विक्रमाची पूर्वतयारी सुरू केली.
कमला नेहरू पार्कवरील हिरवळीवर रविवारी विविध रंगांची मुक्त उधळण झाली. ‘मदर इंडिया क्रोशे क्लब’च्या सदस्यांनी लोकरीच्या एका सुईने क्रोशा पद्धतीने वीणकाम केलेली एक मीटर बाय एक मीटरची पाच हजार ब्लँकेट्स एकत्र जोडून एक भले मोठ्ठे ब्लँकेट बनविण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी ३ हजार ७२७ ब्लँकेट्स एकत्र जोडलेला विक्रम दक्षिण आफ्रिकेत नोंदविण्यात आला आहे. हा विक्रम मोडून भारतीयांच्या नावे नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या उद्देशातून चेन्नईच्या शुभश्री नटराजन यांनी देशभरातील महिलांना आवाहन केले. त्यातूनच ‘पुणे क्रोशा क्वीन्स’ या गटाची निर्मिती झाली.
मीनाक्षी गणेशन आणि आसिया शेख या पुण्याच्या संयोजिका असून १५५ महिला या गटाच्या सदस्या आहेत. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या पुढाकाराने ब्लँकेट्स जोडण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मुळात युरोपातील ही कला पुण्यातील भगिनींनी आत्मसात केली असून त्यामध्ये प्रावीण्य मिळविले आहे. अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रोशा कॅलेंडरची निर्मिती करणाऱ्या मृणालिनी आठवले या वेळी उपस्थित होत्या.