ब्रिटन आणि अमेरिकेत शतकांचा इतिहास असलेली पेट मॅगझिनची परंपरा भारतात रुजायला उदारीकरणानंतरही दशक  जावे लागले. कारण इथल्या घराघरांतील प्राणिपालकआताइतके सजग नव्हते आणि अतिचिकित्सक प्राणिपालकांसाठी परदेशातील प्राणी संगोपनाच्या मासिकांची उपलब्धता होती. पण परदेशी मासिकांमध्ये दिली जाणारी माहिती आणि तपशिलांची मर्यादा ही वातावरण आणि कटिबंधानुरूप उघड पडू लागली. इथल्या जाणकार प्राणिअभ्यासक आणि शौकिनांना मग देशी वातावरणानुसार प्राण्यांच्या संगोपनातील कौशल्यांचे आदान-प्रदान करणे आवश्यक वाटू लागले. त्यातून ९० च्या दशकाच्या अखेरीस पशुपालनासंबंधित अस्सल देशी नियतकालिकांनी पाय रोवायला सुरुवात केली. आदर्श अर्थातच परदेशी असले, तरी इथल्या वाढत्या बाजारपेठेसोबत या मासिकांनीही बाळसे धरले. इंटरनेट-फोरम्स-ब्लॉग्जच्या आणि जगात निघणाऱ्या नियतकालिकांच्या तुलनेमध्ये या नियतकालकांचे स्वरूप छोटे असले, तरी हळूहळू त्याचा पसारा आणि वाचकवर्ग विस्तारत आहे.

भारतीय प्रकाशने

भारतीय प्रकाशन संस्थांनी अगदी अलीकडच्या काळात पशुपालनाच्या छंदाला विस्तारित करण्यासाठी त्यावरील नियतकालिके आवश्यक असल्याचे जाणले. या मासिकांची काळानुरूप वाढती गरज आणि व्याप्ती यांचा अदमास घेतल्यानंतर त्यांच्याकडे आपले लक्ष वळवले. सद्यस्थितीत मात्र हा व्यवहार अद्यापही मर्यादित आहे. सध्या प्राणी संगोपनावरील ८ ते १० भारतीय नियतकालिके आहेत. बहुतेक सारी द्वैमासिके आहेत. ‘डॉग्स अँड पप्स’, क्रिएचर कम्पॅनिअन, डॉग्स अ‍ॅड मोअर, ‘बडी लाईफ’, ‘फर, फाईन अँड फेदर्स’ ही  आघाडीची उदाहरणे देता येतील. ‘पेट मॅगझिन्स’ ही संकल्पना भारतात स्वीकारली गेली तरीही जगात त्यामध्ये सापडणारे वैविध्य, विशिष्ट प्राणी अथवा विषयाला वाहिलेले अंक काढण्याचा ट्रेंड दिसत नाही. भारतातील पाळीव प्राण्यांत सर्वाधिक संख्या ही कुत्र्यांची आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत खर्चही कुत्र्यांवरच अधिक केला जातो. भारतीय पेट इन्डस्ट्रीचे अर्थकारण हे कुत्र्यांवरच केंद्रित आहे. त्यामुळे या नियतकालिकांमधून इतर पाळीव प्राण्यांबाबतचे विषय हाताळले जात असले तरीही मुख्य भर हा कुत्र्यांचे संगोपन, त्यांचे आरोग्य, त्यांच्यासाठीची उत्पादने, नवी उपकरणे यांवर आहे. मांजरे, परदेशी पक्षी, हॅमस्टर्ससारखे छोटे प्राणी यांच्या संगोपनावर आधारित स्वतंत्र नियतकालिके नाहीत.

भारतात पशुपालनाचा छंद आणि त्याची बाजारपेठ झपाटय़ाने वाढत असली तरीही नियतकालिकांच्या वाढीला मर्यादाही मोठय़ा प्रमाणावर आहेत. उपलब्ध असलेले अंक हे इंग्रजीमध्ये आहेत. भारतीय स्थानिक भाषांमध्ये पशू संगोपनावरील स्वतंत्र अंक नाहीत. त्यामुळे असलेल्या नियतकालिकांच्या वाचकांची संख्याही मर्यादित आहे. सध्या असलेली भारतीय नियतकालिके ही साधारण १२ ते २० हजार प्रतींचे वितरण असल्याचा दावा करतात. भारतीय अंकांना दुसरी मर्यादा आहे ती परदेशी प्रकाशनांची. भारतात ‘पेट मॅगझिन्स’ सुरू होण्यापूर्वीपासून परदेशी अंक इकडे उपलब्ध होत आहेत. त्याचे अगदी घरोघरी वितरण होत नसले तरीही मोठी हॉटेल्स, पशुवैद्य, ग्रुमर्स हा मोठा वाचक किंवा ग्राहक गट या परदेशी अंकांनी पूर्वीपासून आपलासा केला आहे. त्यामुळे ‘पेट इन्डस्ट्री’ची ओळख करून देण्याच्या भूमिकेत असलेल्या भारतीय अंकाना तुलनेने अधिक अद्ययावत असलेल्या या परदेशी अंकाच्या बाजारपेठेचे कायमच मोठे आव्हान राहिले आहे.

ऑनलाईन बाजारपेठ

भारतात छापील स्वरूपात ‘पेट मॅगझिन्स’ बाजारात आली. तेव्हा एकूणच छापील अंकांची वाटचाल ही डिजिटलायझेशनकडे सुरू झाली होती. त्यामुळे उभरणाऱ्या पशू संगोपनाच्या उद्योगावर भारतीय अंक तगले असले तरीही त्यांची वाढ मोठय़ा प्रमाणावर झाली नाही. त्याऐवजी ऑनलाईन मॅगझिन्सचा ट्रेंड अधिक मोठा होताना दिसतो आहे. भारतीय पशू संगोपन आणि बाजारपेठेची ओळख करून देणारी २० ते २५ ऑनलाईन मॅगझिन्स, संकेतस्थळे आहेत. ‘डॉग एक्सप्रेस’, ‘स्कूप व्हूप’ सारखी तासागणिक अद्ययावत होणारी, पशू संगोपन बाजार, त्यातील नव्या लाटांपासून ते माणूस आणि प्राण्यांच्या संघर्षांच्या समस्या यांची बित्तंबातमी देणारी संकेतस्थळेही आहेत. त्याचबरोबर परदेशात प्रकाशित होणाऱ्या अंकांच्या आवृत्त्याही इंटरनेटवर सहजी उपलब्ध होतात. पेट हॉस्टेल्स, ग्रुमर्सही साप्ताहिक किंवा मासिक न्यूजलेटर्स ऑनलाईन प्रकाशित करतात. आपल्या ग्राहकांना काही अधिक देण्याच्या हेतूने ती प्रकाशित केली जातात. ऑनलाईन अंकाशी असलेल्या स्पर्धेने भारतीय पेट मॅगझिन्सना आता अर्थकारणाचे गणित जमवणे अवघड केले आहे.