पुणे : नाताळानिमित्त लष्कर भागात बुधवारी (२५ डिसेंबर) होणारी गर्दी विचारात घेऊन या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. गर्दी वाढल्यानंतर महात्मा गांधी रस्ता (एम. जी. रोड) वाहतुकीस बंद करण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.नाताळानिमित्त लष्कर भागात शहर, तसेच उपनगरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावर गर्दी वाढल्यास वाहतूक बंद ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून बदल करण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत या भागात वाहतूक बदल लागू राहणार आहेत. वाय जंक्शन येथून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करण्यात येणार असून, या भागातील वाहतूक कुरेशी मशीद, सुजाता मस्तानी चौकातून वळविण्यात येणार आहे. इस्काॅन मंदिराकडून अरोरा टाॅवर्सकडे येणारी वाहतूक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून तीन ताेफा चौकाकडे सोडण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा…भाजपचा शहरातील नवा कारभारी कोण? महापालिका निवडणुकीची धुरा मोहोळांकडे की पाटलांकडे, याची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून वाहतून लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, या भागातील वाहने ताबुत स्ट्रीटमार्गे जातील, असे वाहतूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.