नागरिकांना आपल्या शहराविषयी काय वाटते, शहरात सुरू असलेले प्रकल्प किंवा उपलब्ध सेवा-सुविधांमध्ये कोणते उपाय सुचवावेसे वाटतात, ते राहतात त्या भागांत कोणत्या समस्या जाणवतात, आदी बाबी मांडण्यासाठीचे हे व्यासपीठ…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांतील रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाइनच्या नावाखाली अरुंद केले जात आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अहिल्यादेवी हाेळकर (माेरवाडी) चाैकात सुधारणा करण्यासाठी (जंक्शन इम्प्रूव्हमेंट) सिमेंटचे ब्लॉक टाकल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे हा चाैक आणि परिसरात माेठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी हाेऊ लागली आहे. महापालिकेच्या नवीन प्रयोगांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी त्यात भर पडताना दिसून येते.
महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई महामार्गावर सेवा रस्त्याच्या कडेला पिंपरी ते चिंचवडदरम्यान अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार रस्त्यांची रचना केली आहे. यामुळे या भागातील रस्ते अरुंद झाले असून, पदपथ माेठे झाले आहेत. सेवा रस्त्याच्या एका बाजूला महामेट्रोचे, तर दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या जलवाहिनीचे काम सुरू आहे. मोरवाडी चौक हा पिंपरीगाव, अजमेरा कॉलनी, पिंपरी महापालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि पुण्याकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. याशिवाय निगडी, देहूरोड, तळेगाव आणि मावळ भागांमध्ये जाण्यासाठीदेखील या चौकाचा मोठा उपयोग होतो. मात्र, या चौकात नेहमी वाहतूक कोंडी होत असते.
मोरवाडीत महामेट्रोचे स्थानक, वस्त्रदालन, सराफी पेढी असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. संबंधित आस्थापनांसमोरील जागा अपुरी पडत असल्याने नागरिक पदपथावरच वाहने उभी करतात. त्यामुळे पादचाऱ्यांचाही खोळंबा होतो. त्यात रिक्षाचालकांची भर पडते. त्यामुळे वाहनांच्या दूरवर रांगा लागतात. चौक ओलांडण्यासाठी वाहतूक नियंत्रण दिव्यापाशी (सिग्नल) किमान तीनदा लाल दिव्याला थांबावे लागते. आता या चौकात सिमेंटचे ब्लॉक टाकले आहेत. चौकात सुधारणा केली जाणार आहे. मात्र, या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून, कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडी आणि गर्दीने ग्रस्त असलेला हा मार्ग महापालिकेच्या नव्या प्रयोगामुळे आणखी अरुंद झाला आहे. यामुळे वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
‘अर्बन स्ट्रीट’चे काम थांबविण्याची मागणी
सम्राट ते वाकड चौक यादरम्यान दत्त मंदिर रस्ता ‘अर्बन स्ट्रीट’च्या नावाखाली ४५ मीटरचा २४ मीटर केला जात आहे. उर्वरित जागेचा वापर पदपथ, सायकल ट्रॅक, वाहनतळासाठी केला जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. अगोदरच कोंडीने नागरिक त्रस्त असून, त्यात भर पडू नये, यासाठी ‘अर्बन स्ट्रीट’चे काम थांबविण्याची मागणी कुणाल वाव्हळकर यांनी केली आहे.
नागरिकांच्या मागण्या काय?
– मोरवाडी चौकात पुरेसे वाहतूक पोलीस नेमावेत.
– बीआरटी मार्गाचा गैरवापर करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करावी.
– रिक्षा व खासगी वाहने निर्धारित मार्गिकेममध्येच थांबवावीत, अन्यथा दंड आकारावा.
मोरवाडी चौक परिसर सध्या गंभीर वाहतूक कोंडीचा सामना करत आहे. पादचाऱ्यांपासून वाहनचालकांपर्यंत सर्वच घटक त्यात अडकत आहेत. महापालिकेने नवीन प्रयोग करण्याऐवजी अगोदर कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.- रविराज काळे
मोरवाडी चाैक परिसरात वाहतूक काेंडी हाेऊ नये आणि नागरिकांना सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी ‘जंक्शन इम्प्रूव्हमेंट’ करण्यात आले आहे. वाहने एका मार्गिकेमध्येच उभी राहावीत, विरुद्ध दिशेने वाहने येऊ नयेत, चाैकात रिक्षा थांबू नयेत, यासाठी सिमेंटचे ब्लॉक टाकून ‘बॅरिकेडिंग’ करण्यात आले आहे. ‘जंक्शन इम्प्रूव्हमेंट’ला पाेलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी केली जात आहे. – बापूसाहेब गायकवाड,सहशहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
तुम्हीही पाठवू शकता समस्या
तुमच्या भागात जाणवणाऱ्या समस्यांबाबत तुमचे मत वा गाऱ्हाणे मांडायचे असेल, तर त्यासाठी ई-मेल आयडी : lokpune4@gmail.com
