पालिका, पोलीस प्रशासनाचा कारवाईऐवजी बैठकांवरच जोर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी वाहतुकीच्या समस्या भेडसावत आहे. तथापि, पालिका व वाहतूक पोलिसांचा फक्त बैठकांवर जोर आहे. मूळ समस्या तशाच असून प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. शहरातील जवळपास सर्वच चौक तसेच पदपथांवर वर्षांनुवर्षे अतिक्रमणे आहेत, त्यावर कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येते. शहरातील वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. शहरातील असा एखादाच भाग असेल, त्या ठिकाणी वाहतुकीशी संबंधित समस्या नसेल. तथापि, याविषयी फक्त बैठका होतात. प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येते. पोलीस व महापालिकेने एकत्र येऊन त्यावर उपाययोजना करण्याचा यापूर्वीच निर्णय घेतला. कुठेही वाहने लावण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, ही सार्वत्रिक समस्या लक्षात घेऊन शहराचे वाहनतळ धोरण तयार करण्यात आले. यासह वाहतुकीच्या विविध समस्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यालयात पालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली.
पालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, डॉ. सागर कवडे, सतीश माने यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहनतळ धोरणाची १९ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पालिका व पोलिसांकडून संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा थांब्यांचे सर्वेक्षण होणार असून आवश्यकतेनुसार त्यांचे स्थानांतरण करण्यात येणार आहे. याशिवाय, पदपथांवरील अतिक्रमण प्राधान्याने काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पदपथ गायब, सेवा रस्त्यावरही ताबा
पादचारी मागार्वरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे तसेच यापुढे पदपथावर अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी बैठकीत दिले. आतापर्यंत अशाप्रकारचे आदेश पालिका मुख्यालयातून अनेकदा देण्यात आले. प्रत्यक्षात शहरभरात पदपथांवर जागोजागी अतिक्रमणे आहेत, ती कमी होण्याऐवजी वाढताना दिसतात. कासारवाडीत वाहने सुशोभीकरण करणाऱ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमुळे महामार्गावरील पदपथ गायब झाले असून सेवा रस्त्यावरही त्यांनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवला आहे. पालिका व पोलिस अधिकाऱ्यांना उघडपणे हे दिसत असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.