पुणे : ‘पुण्यात वाहतुकीसह कचरा आणि पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील या ३० टक्के खराब गोष्टींमुळे ७० टक्के चांगल्या गोष्टी झाकोळल्या जात आहेत. त्यातून शहराची प्रतिमा मलिन होत आहे,’ अशी कबुली महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी दिली. शहरातील समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. क्रेडाई- पुणे मेट्रोच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आयुक्त नवल किशोर राम बोलत होते. ते म्हणाले, ‘शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर आहे. यामागे प्रामुख्याने शहरात सुरू असलेले ३० ते ३५ मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प कारणीभूत आहेत. शहरातील ३३ टक्के रस्त्यांवरून ८० टक्के वाहतूक होते आणि त्याच रस्त्यांवर कामे सुरू असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. लवकरात लवकर पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे आणि मिसिंग लिंकच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. याचबरोबर रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कडक कारवाई केली जाईल.’
‘पुण्यातील अनेक ठिकाणी कचरा साचलेला दिसतो. महापालिकेचे कर्मचारी सकाळी कचरा उचलतात आणि काही तासांत नागरिक तिथे पुन्हा कचरा टाकतात. कचरा न करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या धर्तीवर पुण्यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. त्यात लोकसहभागावर भर दिला जाईल. या माध्यमातून नागरिकांच्या वर्तनात सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. पुढील सहा महिन्यांत शहरात सगळीकडे स्वच्छता दिसेल, अशा पद्धतीने काम करण्यात येईल,’ असे त्यांनी सांगितले.
‘शहरातील ३० टक्के भागात पाणीपुरवठ्याची समस्या आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना जलसंपदा विभागाकडून मिळणारा पाणी कोटा अपुरा पडत आहे. शहरात दीड लाख ते दोन लाख नळजोड बेकायदा आहेत. याचबरोबर पाणीगळती आणि चुकीचे पाणीवाटप या गोष्टीही पाणीपुरवठ्यात अडसर ठरत आहेत. त्यामुळे याबाबत उपाययोजना करून पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी पावले उचलली जातील,’ असे आयुक्तांनी नमूद केले.
सर्वप्रथम नवीन आजार पुण्यात का?
‘देशात कोणताही नवीन आजार आला, की त्याचे रुग्ण पहिल्यांदा पुण्यात आढळतात. काही दिवसांपूर्वी शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या गंभीर विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. प्रत्येक नवीन रोगांचे रुग्ण पुण्यात सर्वप्रथम आढळून येत असल्याने याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे,’ असेही आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.