scorecardresearch

मूळ भाषेतून केलेले अनुवाद सकस ; डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे मत

कोणत्याही साहित्यकृतीचा अनुवाद हा ती साहित्यकृती ज्या मूळ भाषेत आहे त्यावरून केला तरच तो सकस ठरतो, असे मत ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी रविवारी व्यक्त केले.

पुणे : कोणत्याही साहित्यकृतीचा अनुवाद हा ती साहित्यकृती ज्या मूळ भाषेत आहे त्यावरून केला तरच तो सकस ठरतो, असे मत ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी रविवारी व्यक्त केले.

डॉ. भैरप्पा यांच्या ‘गृहभंग’ या कादंबरीच्या उमा कुलकर्णी यांनी केलेल्या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अनुवादक उमा कुलकर्णी आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे अखिल मेहता या वेळी उपस्थित होते. भैरप्पा म्हणाले, ‘गृहभंग’ या कादंबरीचा मराठी अनुवाद नॅशनल बुक ट्रस्टतर्फे पहिल्यांदा प्रकाशित झाला होता. हा अनुवाद हिंदीवरून मराठीत करण्यात आला होता. त्या तुलनेत उमा कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद थेट कन्नडमधून केला आहे. स्रोत भाषा म्हणून मूळ भाषेचा वापर झाल्यास अनुवाद अधिक सकस होतो. त्यामुळे अनुवाद करताना थेट त्या मूळ भाषेवरूनच व्हावेत. निव्वळ व्यवसाय म्हणून प्रकाशनाकडे पाहणाऱ्या काही प्रकाशकांकडून लेखकांना मानधनही दिले जात नाही. असे होता कामा नये. प्रकाशकांनी सेवा क्षेत्र म्हणूनही प्रकाशनाकडे पाहायला हवे, अशी अपेक्षा भैरप्पा यांनी व्यक्त केली.  भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांमधून भारतीय समाजव्यवस्था, जाती व्यवस्था, राजकारण, कुटुंबव्यवस्था याचे नेमके प्रतििबब पाहायला मिळते, असे मत जोशी यांनी व्यक्त केले. गृहभंग कादंबरीचे कथासूत्र भैरप्पा यांच्या आत्मकथनाच्या जवळ जाणारे असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. योजना यादव यांनी सूत्रसंचालन केले.

मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या ‘गृहभंग’ या अनुवादित कादंबरीचे प्रकाशन रविवारी झाले. त्यानंतर भैरप्पा यांनी कादंबरी घेणाऱ्या वाचकांशी संवाद साधत त्यांना स्वाक्षरी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Translated original language dr s l bhairappa literature literary council amy