सहकारनगर भागात ट्रेझर पार्क ही सोसायटी आहे. सोसायटीमध्ये दरवर्षी विविध सण, उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. सोसायटीमध्ये कला, नाटय़ क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी वास्तव्यास असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रमांमध्ये त्याचे प्रतिबिंब नेहमीच दिसते. सोसायटीने सामाजिक भानही जपले असून पुण्यासह राज्यात आणि देशभरात कुठेही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित दुर्घटना घडल्यास सोसायटीच्या सदस्यांकडून नेहमीच मदत केली जाते. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला देशभक्तिपर कार्यक्रमासह, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, फराळ वाटप, वाहतूक नियमनात उस्फूर्त मदत असे उपक्रम करण्यात सोसायटीचे सदस्य नेहमीच सक्रिय असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेझर पार्क सोसायटी सहकारनगर भागात आहे. सोसायटीच्या आठ इमारती असून ३५६ सदनिका आहेत. सोसायटीचा पसारा सहा एकर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. सोसायटीमधील प्रत्येक कुटुंबात एक कलाकार आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. गणेशोत्सव, दिवाळी पहाट या कार्यक्रमांसह वर्षभर सोसायटीमध्ये विविध कार्यक्रम होत असतात आणि या कार्यक्रमांमध्ये केवळ सोसायटीचेच सदस्य त्यांची कला सादर करतात.

सोसायटीमध्ये दरवर्षी सात दिवसांचा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी लहान मुले आणि इतर सर्व सदस्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दुसऱ्या दिवशी लहान मुले आणि महिलांकडून सामूहिक आणि देशभक्तिपर गीते सादर केली जातात. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सामाजिक संदेश देणारे तीन तासांचे नाटक सादर केले जाते. सोसायटीमध्ये नाटय़ कलाकारांची संख्या अधिक असल्याने तेच दरवर्षी विविध विषयांवरील नाटक सादर करतात. चौथ्या दिवशी लहान मुलांचा वाद्यवृंद ठेवला जातो. पाचव्या दिवशी भोंडला, सहाव्या दिवशी विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये कॅरम, बुद्धिबळ, रांगोळी, पाककला अशा बैठय़ा खेळांपासून लंगडी, क्रिकेट, खो-खो, कबड्डी अशा मैदानी खेळांपर्यंत सर्व स्पर्धाचा समावेश असतो. उत्सवातील स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ सातव्या दिवशी आयोजित केला जातो. या दिवशी दीडशे ते दोनशे पारितोषिकांचे समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते वितरण केले जाते. गणेशोत्सवात उत्सवाचा अध्यक्ष म्हणून दरवर्षी नव्या व्यक्तीला संधी दिली जाते.

सोसायटीत दिवाळीत किल्ला बनवला जातो. तसेच दिवाळी पहाट हा चार तासांचा कार्यक्रम सोसायटीच्या आवारातच सोसायटीमधील कलाकारांकडून सादर केला जातो. या कार्यक्रमासाठी भव्य मांडव टाकला जातो. मांडव, सदस्यांना बसण्यासाठीच्या खुच्र्या, व्यासपीठावरील आवश्यक साहित्य, ध्वनियंत्रणा या व्यवस्था सोसायटीच्याच आहेत हे विशेष. दिवाळीनिमित्त सोसायटीच्या परिसरात दिव्यांची रोषणाई केली जाते. फराळ वाटप केले जाते. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी सोसायटीमध्ये मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन केले जाते. देशाच्या सीमेवर हुतात्मा होणाऱ्या जवानांना या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली जाते. याबरोबरच लष्करात सेवा बजावलेल्या जवानांना आमंत्रित केले जाते. त्यांच्या उपस्थितीत देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो. देशप्रेमाची भावना, देशासाठी लढणाऱ्या जवानांची या निमित्ताने आठवण राहावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो. या दोन्ही दिवशी सोसायटीमधील शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये देशभक्तीपर गीत, नृत्य सादर केले असल्यास तेच कार्यक्रम सोसायटीमध्ये सादर केले जातात. सोसायटीमध्ये दरवर्षी होळी आणि कोजागर पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागर पौर्णिमेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि सारे सभासद पिठुर चांदण्यामध्ये आटीव दुग्धपानाचा आनंद लुटतात.

सोसायटीने सामाजिक भानही जपले आहे. नुकताच केरळमध्ये पूर येऊन गेला, त्या वेळी सोसायटीकडून दोन ट्रक धान्य आणि कपडे तेथे पाठविण्यात आले. पाटील इस्टेट परिसरात आग लागली होती, त्या वेळीही तेथील स्थानिकांना दोन टेम्पो भरून चांगल्या दर्जाचे कपडे देण्यात आले होते. याबरोबरच दांडेकर पूल परिसरातील जनता वसाहत येथे मुठा उजवा कालवा फुटण्याची दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी  दैनंदिन वापरासाठी लागणारे विविध प्रकारचे धान्य वाटप करण्यात आले होते. सोसायटीकडून पोलिसांना फराळ वाटप केले जाते. कात्रज, सहकारनगर येथील पोलीस चौकी आणि पोलीस ठाण्यांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. सोसायटीच्या आवारात आणि सहकारनगर भागात सोसायटीमधील सदस्यांकडून वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमनासाठी  नेहमीच मदत केली जाते. सोसायटीचे स्वत:चे खुले सभागृह आहे, जॉगिंग ट्रॅक आहे. बॅडमिंटन सभागृह आणि जलतरण तलाव आहे. स्केटिंग कोर्ट आणि बाग आहे. ओला आणि सुका कचऱ्याचा प्रकल्प आहे. पर्जन्य जलपुनर्भरण प्रकल्पही सोसायटीमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून सदनिकाधारकांना करामध्ये सवलत मिळते.

सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून लता देशपांडे काम पाहतात. खजिनदार मनोज शहा आहेत. अ‍ॅड. घनश्याम खलाटे, ज्योतिबा उबाळे, डॉ. राहुल सावंत, प्रमोद गरड, प्रवीण भालेराव, गजानन जोशी, नितीन प्रभुणे, प्रशांत पाटील हे सदस्य सोसायटीच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय असतात.

prathamesh.godbole@expressindia.com

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treasure park
First published on: 21-06-2019 at 10:35 IST