लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता नागरिकांना घराजवळ आणि जलद उपचार मिळावेत, यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ७९ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रामुळे नागरिकांना घराजवळ उपचार मिळण्याबरोबरच मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे.
महागाईच्या काळात वैद्यकीय उपचार सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सेवा दर्जेदार असल्यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये आठ मोठी रुग्णालये, २७ दवाखाने, २० आरोग्य केंद्र, आठ कुटुंब नियोजन केंद्र, ३६ लसीकरण केंद्र आहेत. ७५० खाटांच्या क्षमतेचे सर्वांत मोठे वायसीएम, ४०० खाटांचे थेरगाव, १०० खाटांचे नवीन भोसरी, १३० खाटांचे नवीन आकुर्डी आणि १२० खाटांचे नवीन जिजामाता यासह एक हजार ५८९ खाटांची व्यवस्था महापालिकेच्या रुग्णालयांत आहे.
आणखी वाचा-कार्तिक यात्रेनिमित्त नगर रस्त्यावरुन आळंदीकडे जाणारी जड वाहतूक बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
मोठ्या रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी शहरात आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेला भाग, झोपडपट्टी, दाट मनुष्यवस्ती, चाळी, एक किलो मीटर अंतरावर महापालिका रुग्णालय, दवाखाना उपलब्ध नाही, अशा २५ ठिकाणी ‘जिजाऊ क्लिनिक’ सुरू करण्याचे नियोजन केले होते. यामधील दापोडी, काळेवाडी, रावेत आणि दिघी या चार ठिकाणी क्लिनिकचे काम अंतिम टप्प्यात आहे. या क्लिनिकचे काम पूर्ण होताच हे आरोग्यवर्धिनी केंद्रात समायोजन करण्यात येणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयांना तीन कोटी
एका आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना तीन कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या वतीनेही मदत मिळणार आहे. नागरिकांना घराजवळच प्राथमिक उपचार मिळाल्याने रुग्णालयावरील ताण कमी होईल. गरजूंना लवकर उपचार देणे शक्य होईल. शासनामार्फत आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पुरविणे शक्य होईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले.
आणखी वाचा-गोखलेनगर भागात गुंडांची दहशत; तलवारी उगारुन दुकानांची तोडफोड
शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेवर ताण येण्याची शक्यता आहे. यासाठीच राज्य सरकारच्या सुचनेनुसार आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ७९ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत. -विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका