लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त (कार्तिक यात्रा) श्री क्षेत्र आळंदी येथे राज्यभरातून वारकरी बांधवांची दर्शनासाठी गर्दी होते. कार्तिक यात्रेनिमित्त नगर रस्त्यावरील मरकळ येथून आळंदीकडे जाणााऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
नगर रस्त्यावरील मरकळमार्गे आळंदीकडे जाणाऱ्या जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. जड वाहनांनी नगर रस्ता, लोणीकंद, खराडी, येरवडामार्गे गोल्फ क्लब चौक, आळंदी रस्ता, चंद्रमा चौक, होळकर पूल, जुना मुंबई-पुणे रस्ता, बोपोडी, नाशिक फाटा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आणखी वाचा-गोखलेनगर भागात गुंडांची दहशत; तलवारी उगारुन दुकानांची तोडफोड
कार्तिक यात्रा ५ ते १२ डिसेंबर या कालावधीत साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने श्री क्षेत्र आळंदी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्तिक यात्रेसाठी आळंदीत राज्यभरातून वारकरी बांधव दाखल होतात. आळंदी परिसरात मोठी गर्दी होते. आळंदीतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नगर रस्त्यावरील मरकळमार्गे आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.