चित्र असो वा रांगोळी, त्याची शोभा चौकटींनी अधिक खुलते. वेलबुट्टीच्या शालू, पठणीची नजाकत भरजरी काठाने अधिक वाढते. तसेच बागेतही पायवाटेच्या कडेने हिरवळीच्या किंवा वाफ्याच्या बाजूने अथवा कुंपणाशेजारी शोभिवंत पानांची झाडे लावली तर बागेची नजाकत अन् शोभा वाढते व संरक्षणही मिळते.

माझ्या लहानपणी बंगल्याच्या कुंपणाला नाजूक पोपटी पानांची मेंदीची झाडे होती. अन् उन्हाळ्यात आमचे माळीबुवा सत्तुभाऊ या मेंदीची पाने काढून पाटय़ावर वाटून त्याचा गोळा करून आम्हाला देत असत. आम्ही मत्रिणी एकमेकींच्या हातावर या मेंदीने गोळ्यांची, ठिपक्यांची नक्षी काढत असू. त्या मेंदीचा केशरी रंग अन् मंद गंध कसा विसरणार.. पूर्वी बहुतेक बंगल्यांच्या कुंपणाला मेंदी लावली जात असे. आपणही सोसायटीच्या बागेत, पटांगणाभोवती मेंदीची रोपं लावू शकतो. मेंदीला पाणी कमी लागते अन् फारशी देखभाल लागत नाही. वाटिकेत रोपं मिळतात. जुन्या झाडाची छाटणी केल्यास काडय़ा लावून नवीन रोपं करता येतात. मेंदीच्या पानातील लोसोन द्रव्यामुळे त्वचेस रंग चढतो. उन्हाळ्यात सेंद्रिय मेंदी पायाला लावल्यास पायाची जळजळ कमी होते.

सार्वजनिक बागांमध्ये कडू वासाच्या कोयनेलचा वापर हिरव्या भिंती (हेज) करण्यासाठी करता येतो. गर्द हिरव्या रंगाची पाने मेंदीच्या पानांपेक्षा थोडी मोठी असतात. पांढरी फुले येतात. वाढ जोरकस असल्याने वारंवार छाटणी करून दाट हिरवी भिंत तयार करता येते. कोयनेल क्लोरेडेंड्रॉन फॅमिलीचा सदस्य आहे. वाटिकेत रोपं मिळतात. काडय़ांपासून नवीन रोपे तयार करता येतात. बागांमध्ये झाडांचे वेगवेगळे आकार (टोपिअरी) करण्यासाठी कोयनेलचा उपयोग होतो. पण याला लागतात तरबेज हात.

हिरव्या भिंतीसाठी व्हर्बिनेसी कुटुंबाचा डय़ुरांटा लोकप्रिय आहे. कातरलेल्या पानांचा, हिरव्या पानाचा, पांढरा, हिरवा मिश्र रंगाचा पिवळट पोपटी, गोल्डन डय़ुरांटा सुंदर दिसतो. रोपं वाटिकेत सहज मिळतात. दोन रोपात दीड-दोन फुटांइतके अंतर ठेवावे. एक-दीड फुटांपासून पाच-सहा फुटांपर्यंत उंच हिरवी भिंत करता येते. छाटणी करताना खाली रुंद, वर अरुंद किंवा खाली अरुंद आणि वर रुंद अशी विविधता राखता येते. डय़ुरांटाला नाजूक, जांभळी फुले व मण्यांसारखे केशरी फळांचे घोस येतात.  फायकस प्रजातीतील झाडे प्रांगणात हेजसाठी वापरता येतात. गडद हिरव्या रंगाची पाने , हिरव्या पांढऱ्या मिश्र रंगाची पाने असलेला फायकस जोरकस वाढतो. सतत छाटावा लागतो. पण पानांच्या दाटीने गच्च हिरवा आडोसा मिळतो. टोपिअरीसाठीदेखील याचा वापर होतो. पु. ल. देशपांडे उद्यानात टोपिअरीच्या वैविध्यपूर्ण रचना पाहायला मिळतात. फायकस कुटुंबाचे आपले परिचित दीर्घजीवी सदस्य आहेत वड, पिंपळ व औदुंबर, ज्यांना निसर्गात मुख्य प्रजाती म्हणून मान आहे. चमकत्या हिरव्या पानाची पांढऱ्या सुगंधी फुलाची कुंती कडीलिंबाच्या मुराया कुटुंबातली. हिची भिंत दिसते छान, पण वाढ फार हळू आहे. हेज करताना हेतू लक्षात घेऊन झाडांची निवड करावी. फुलांच्या वाफ्यात कोणी जाऊ नये असा हेतू असल्यास लालुंग्या पानांच्या अल्टरेनथेराची नाजूक चौकट करावी. याला रीफ म्हणतात. पिवळा लँटेना, व्हर्बनिा वाफ्यांभोवती व हिरवळीभोवती छान दिसतो. मात्र ही रोपं अगदी जवळ-जवळ सहा इंचांवर लावावीत, जेणेकरून वाढव्यावर मध्ये मोकळी जागा राहणार नाही. खलिफाची पांढरी, हिरवी झालरीसारखी पाने छान दिसतात. रोपे पटकन वाढतात. अजिबात देखभाल लागत नाही. रोपांची वाढ आडवी होण्यासाठी वेळोवेळी छाटणी करावी लागते. टॅकोमा, एकेरी जास्वंद, हायड्रँजिया यांच्या फुलांच्या भिंतीही छान दिसतात. वाऱ्यापासून संरक्षण किंवा अडोसा म्हणून विविधरंगी बोगनवेलीची भिंत करता येते. दिसते सुंदर पण वाढीचा वेग जबरदस्त असल्याने मोठय़ा कात्रीने सतत छाटणी करावी लागते. झाडे जमिनीत लावायची नसल्यास ज्युनिपर, सायप्रसची रोपे एकसारख्या कुंडय़ांत लावून त्याचीही िभत करता येते. हिरव्या भिंतींना नवीन फुटीच्या वेळी सेंद्रिय माती व नीमपेंड घालाावी. ठिबक सिंचन केल्यास पाण्याची बचत होते. सोसायटीमध्ये कृष्णतुळस, अडुळसा, गवती चहा याचाही उपयोग बॉर्डर म्हणून छान होतो, उपयोगही होतो. फार्महाऊसच्या कुंपणाला काटेरी शिकेकाई किंवा सागरगोटा लावल्यास संरक्षण मिळते.

हिरव्या भिंती बागेचे सौंदर्य वाढवतात. बागेस आखीव-रेखीव नेटकेपणा देतात. कॉकिंट्रच्या भिंतींमध्ये राहिलो तरी या जिवंत भिंतींना आपल्या जीवनात स्थान हवेच, नाही का?

प्रिया भिडे  (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचकांचे प्रश्न, समस्यांवरील वाचकांचे म्हणणे मांडण्यासाठी ‘लोकमानस’ हे आमचे व्यासपीठ कायमच उपलब्ध आहे. आता पुण्यातील समस्यांवर तुमचे म्हणणे मांडण्यासाठी ‘लोकसत्ता पुणे’ या आमच्या सहदैनिकातही ‘लोकमानस’ या सदरात पत्रांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे. तुमचे म्हणणे, पत्रे तुम्ही खालील पत्त्यावर पाठवू शकता.

पत्ता – ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट नं. १२०५ /२/६, शिरोळे रस्ता,  शिवाजीनगर, पुणे – ४११००४

ईमेल – lokpune4@gmail.com