तुकाराम मुंढे हाजिर हो!.

‘सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेली पीएमपी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

tukaram mundhe
तुकाराम मुंढे

खास सभेसाठी उपस्थिती बंधनकारक करणारा स्थायी समितीमध्ये ठराव

पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याचा विचार करण्यासाठी आणि पीएमपीला सुस्थितीमध्ये आणण्यासाठी धोरण निश्चित करण्यासाठी महापालिकेत खास सभा आयोजित करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. या सभेत उपस्थित राहणे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना बंधनकारक करावे, असा प्रस्तावही स्थायी समितीने मान्य केला आहे.

‘सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेली पीएमपी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कंपनीच्या गैरकारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरवाढीमुळे नागरिकांमधील असंतोष, अधिकारी वर्गाची पीएमपीबाबत असलेली अनास्था, खासगी बस ठेकेदार आणि बसचालकांची मुजोर वृत्ती, शिस्तीच्या नावाखाली यंत्रणेला वेठीस धरण्याचा प्रकार, व्यावसायिक नियोजनाच्या अभावामुळे कंपनी दिवाळखोरीकडे जात आहे. सातत्याने येणाऱ्या वित्तीय तोटय़ामुळे तो भरून काढण्याची जबाबदारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला उचलावी लागत आहे. त्यामुळे पीएमपीची सद्य:स्थिती, त्यावरील उपाययोजना आणि ठोस धोरण ठरविण्यासाठी खास सभेचे आयोजन करण्यात यावे आणि या सभेला पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकराक करावे, असा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला आहे. पीएमपीकडून सद्य:स्थितीचा अहवाल, वित्तीय देणी, सुरक्षा अहवाल, बस भाडे वाढीसाठी अवलंबलेली कार्यपद्धती, खासगी बस ठेकेदारांमुळे उद्भवलेल्या समस्या, थकबाकी वसुली, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, स्थावर मालमत्तांचा तपशील याची माहिती या सभेत अधिकाऱ्यांनी द्यावी, असेही स्थायी समितीच्या या ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे.

वाद होण्याची शक्यता

यापूर्वीही पीएमपीच्या विषयावर खास सभेचे आयोजन करण्याची मागणी झाली होती. मात्र या सभेला तुकाराम मुंढे अनुपस्थित राहिले होते. त्यावरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी आणि त्यांच्यात वादही झाला होता. आता पुणे महापालिकेने उपस्थित राहणे बंधनकारक केल्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tukaram mundhe pmpml

ताज्या बातम्या