Manchar Dargah Tunnel Issue: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या मंचर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चावडी चौकात रस्त्याचे काम सुरू असताना येथील दर्ग्याचा एक भाग कोसळला. त्यानंतर कोसळलेल्या भागाखाली भुयारासारखी रचना दिसून आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून हिंदू संघटनांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुस्लीम समुदायातील लोकही जमले. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही समुदायांची समजूत घालत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या भुयाराची पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करत आहेत.
भुयारासारखी रचना आढळल्यानंतर या ठिकाणी शुक्रवारी जेसीबी लावून खोदकामही करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिसरात फौजफाटा वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंदू संघटनांनी याठिकाणी प्राचीन रचना असण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मुस्लीम समुदायाने हा दर्गा शेकडो वर्षापूर्वींचा असल्याचा दावा केला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त लावला आहे. शुक्रवारी रात्री दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मंचर शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत शांतता कायम ठेवली आहे.

मशीद नाही तर दर्गा
मंचरमधील स्थानिक मुस्लीम नागरिक राजू इनामदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मंचर हे सर्वधर्मीयांचे शहर असून येथे धार्मिक तणाव होऊ शकत नाही. काही वृत्तवाहिन्यांनी चुकीच्या बातम्या दिल्यामुळे गैरसमज पसरला होता. इथे मशीद असल्याचे सांगितले गेले. पण हा दर्गा आहे. याचे सर्व पुरावे आंबेगाव तालुक्याच्या प्रशासनाकडे आहे. भुयारासारखी जी रचना आढळली आहे, त्याची माहिती पोलीस घेत आहेत. ती कदाचित कबर असावी, असा अंदाज आहे. तरीही कुणीही याबाबत गैरसमज पसरवून नयेत.
दरम्यान हिंदू संघटनांचा दावा आहे की, याठिकाणी दर्गा नसून एक पुरातन वास्तू होती. इथे रस्त्याचे काम करत असताना भिंत कोसळल्यानंतर हिंदू अवशेष आढळून आल्याचा संशय आहे. आमची प्रशासनाला मागणी आहे का, याची व्यवस्थित तपासणी करावी. त्यानंतर जे सत्य समोर येईल, ते दोन्ही समाज स्वीकारण्यासाठी तयार आहेत. ही प्रक्रिया शांततेत व्हावी, अशी आमची मागणी आहे.
दर्ग्याखाली कबर नाही
हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी न्यूज१८ लोकमत वाहिनीशी बोलताना सांगितले की, दर्ग्याखाली कबर निश्चितच नसावी. कारण मुस्लीम समाज कधीच कबरीवर पाय देत नाहीत. ते कबरीची पूजा करतात. पण जर कबर असेल तर त्यावर ते बांधकाम कसे उभारू शकतात? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.