पिंपरी : लोणावळ्यावरून फिरून येताना समोरून जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात मोटारीतील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवारी) पहाटे पावणेसहाच्या सुमारास देहूरोड येथील ईदगाह मैदानाजवळ झाला.
सिद्धांत आनंद (वय २३ रा. झारखंड) आणि दिव्यराज सिंह राठोड (वय २२, रा. राजस्थान) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मोटारचालक निहाल तांबोळीसह दोघे जखमी झाले आहेत. टेम्पोचालक मनीषकुमार सूरज मणिपाल (रा.मुंबई) याला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबतची माहिती दिली. मयत सिद्धांत, दिव्यराज हे किवळेतील एका महाविद्यालयात बीबीएचा अभ्यासक्रम शिकत होते. त्यांच्यासह चार मित्र लोणावळ्याला फिरण्यासाठी गेले होते. शुक्रवारी पहाटे लोणावळ्याकडून मोटारीतून किवळेला जात होते. निहाल मोटार चालवत होता.
देहूरोड येथील सेंट्रल चौकाच्या पुढे ईदगाह मैदानासमोरून एक टेम्पो जात होता. निहाल याला समोरील टेम्पो दिसला नाही. मोटार पाठीमागून जोरात टेम्पोला धडकली. या अपघातात सिद्धांत, दिव्यराज यांचा जागीच मृत्यू झाला. निहालसह दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाकड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.