पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हडपसरमधील महंमदवाडी रस्ता तसेच सासवड रस्त्यावर अपघात झाले. हडपसर भागातील महंमदवाडी पोलीस चौकीसमोर पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पांडुरंग सुखदेव पेठे (वय ५५, रा. साठेनगर, तरवडे वस्ती, महंमदवाडी रस्ता, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी टँकरचालक मारुती माधव बोयणे (वय ४१, रा. आनंदनगर, तरवडे वस्ती, महंमदवाडी रस्ता, हडपसर) याला अटक करण्यात आली. पांडुरंग पेठे यांचा मुलगा सूरज पेठे (वय २१) याने या संदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पांडुरंग पेठे हातगाडीवर भंगार माल गोळा करण्याचे काम करतात. सकाळी पावणेनऊच्या सुमारात ते हातगाडीवरुन भंगार माल गोळा करण्यासाठी जात होते. महंमदवाडी पोलीस चौकीसमोर पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरने पेठे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेले पेठे यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.

हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी गावाजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास दुचाकीस्वारास भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. छट्टीराम जगदीशप्रसाद यादव (वय ३०, रा. अतुल कड यांची इमारत, वडकी, सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बजरंगी यादव (वय ३२, रा. गोरेगाव, मुंबई) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार छट्टीराम यादव मध्यरात्री दीडच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावरुन जात होता. त्या वेळी भरधाव वाहनाने वडकी गावाजवळ दुचाकीस्वार यादवला धडक दिली. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहे.