पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकरमहाराज उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकी आदळून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिला जखमी झाली.

प्रमोद रामचंद्र कस्तुरे (वय ६६, रा. वैष्णवी अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. अपघातात कस्तुरे यांची पत्नी संजीवनी (वय ५६) जखमी झाल्या. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अभय शेंडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार प्रमोद आणि त्यांची पत्नी संजीवनी रात्री नऊच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकरमहाराज उड्डाणपुलावरून जात होते. त्या वेळी दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्याला घासल्याने दुचाकीस्वार प्रमोद आणि त्यांची पत्नी संजीवनी रस्त्यात पडले. प्रमोद आणि त्यांची पत्नी संजीवनी जखमी झाले.

प्रमोद यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार विद्याधर गांगुर्डे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.