पुणे : दिल्लीतील मुलीला आठव्या वर्षी विषमज्वराचा (टायफॉइड) संसर्ग झाला. त्यानंतर तिने ऐकण्याची क्षमता गमावली. पालकांनी सुरुवातीला तात्पुरता त्रास समजून दुर्लक्ष केले परंतु, काही आठवड्यांनंतर मुलीचे बोलणेही अस्पष्ट होऊ लागले. डॉक्टरांनी अखेर ही मुलगी कर्णबधिर झाल्याचे निदान केले. पुण्यातील डॉक्टरांनी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे या मुलीची श्रवणक्षमता पुन्हा मिळवून दिली आहे. दरम्यान, विषमज्वरामुळे मुलांमध्ये येणाऱ्या कर्णबधिरतेकडे वेळीच लक्ष न दिल्यास कायमचे बहिरेपण पण येऊ शकते याकडे कान-नाक- घसा तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
पालकांनी या मुलीला विविध रुग्णालयांत नेले, परंतु कोठेही त्यांना ठोस उपचार मिळाले नाहीत. अखेर त्यांनी मुलीला पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखवले. येथे कान-नाक-घसा विभागाच्या सहयोगी संचालिका डॉ. वैशाली बाफना यांनी तिच्यावर उपचारांना सुरुवात केली. या मुलीने तिची ऐकण्याची क्षमता गमावल्यापासून उपचारांना व शस्त्रक्रियेला दोन ते तीन वर्षांचा विलंब झाल्याने तिच्या संवाद साधण्याच्या व भाषाकौशल्य शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. अखेर कॉक्लिअर इम्प्लांटचा निर्णय घेण्यात आला. या शस्त्रक्रियेद्वारे मुलीवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले.
याबाबत डॉ. वैशाली बाफना म्हणाल्या, ‘आपल्याला ऐकू न येण्याची कारणे वेगवेगळी आहेत. बाह्य कर्ण, मध्य कर्ण किंवा आंतरकर्णातील समस्येमुळे हे घडू शकते. कानातील कॉक्लिआ हा अवयव काम करणे थांबवतो तेव्हा सर्वोत्तम श्रवणयंत्रेही उपयुक्त ठरू शकत नाहीत. अशा वेळी कॉक्लिअर इम्प्लांट हाच एकमेव पर्याय उरतो.
या इम्प्लांटचा खर्च सुमारे सात ते आठ लाख रुपये असल्याने त्याचा कुटुंबांवर मोठा भार पडतो. विशेषतः गरीब व वंचित पार्श्वभूमीच्या कुटुंबांवर त्याचा परिणाम होतो. यामध्ये लवकर निदान महत्त्वाचे आहे. ऐकू न येण्याचा तोटा बालकांच्या आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांत ओळखला गेला, तर मुलांना लवकर इम्प्लांट दिले जाऊ शकतात. याचबरोबर स्पीच थेरपीसह भाषाकौशल्ये शिकवली जाऊ शकतात.
देशभरात अनेक मुले वर्षानुवर्षे कर्णबधिरतेचे निदान न होता दुर्लक्षित राहतात. विशेषतः वैद्यकीय तपासण्या सहसा होत नाहीत, अशा समुदायांमध्ये ही समस्या दिसून येते. तसेच जवळच्या नात्यातील विवाह, मातृत्वाच्या काळात काळजीचा अभाव, प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत, गर्भावस्थेत उपचार न केलेला संसर्ग, विषमज्वर आणि मेंदूज्वर यांसारख्या आजारांमुळे नवजात बालकांमध्ये ऐकू न येण्याच्या समस्येचा जास्त धोका असतो. – डॉ. वैशाली बाफना, कान-नाक-घसा तज्ज्ञ