करोनाचा यंदाच्या शैक्षणिक वर्षांला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेबाबतही अनिश्चितता आहे. शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतात, यावर याबाबतचा निर्णय अवलंबून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना संसर्गामुळे यंदा राज्यातील शाळा आणि महाविद्यालये अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. ऑनलाइन पद्धतीने आणि शक्य तिथे शिक्षक गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. दहावी आणि बारावीतील अनुत्तीर्ण आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होते. मात्र, करोना संसर्गामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर झाल्याने फेरपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा २० नोव्हेंबरपासून होणार आहे. या बदललेल्या वेळापत्रकाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांवरही होऊन परीक्षा उशिरा होण्याची शक्यता आहे.

‘राज्य मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू होते. मात्र, यंदा परीक्षेबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांकडून भरून, तपासून घेतले जातात. यंदा करोना संसर्गामुळे शाळा-महाविद्यालये सुरू झालेली नाहीत आणि कधी सुरू होतील हे सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरल्याशिवाय परीक्षेचे वेळापत्रक करता येणार नाही,’ अशी माहिती राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

करोना संसर्गामुळे गेल्या वेळी दहावीच्या परीक्षेतील भूगोल विषयाची परीक्षाच रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी-मार्चमधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे काय होणार याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. ‘सद्य:स्थितीत परीक्षा कधी होतील याबाबत काहीही सांगता येणार नाही. कारण त्याबाबत अद्याप निर्णयही झालेला नसल्याने नियोजन करण्यात आलेले नाही. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा शाळा सुरू होण्यावर अवलंबून आहेत,’ असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

ऑनलाइन अर्ज भरणे अशक्य

दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अर्ज प्रक्रिया संवेदनशील आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज शाळा स्तरावर तपासून विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाकडे पाठवले जातात. त्यामुळे परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणे शक्य नाही, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncertainty about 10th 12th exams abn
First published on: 27-10-2020 at 00:26 IST