तीन दिवस.. तीन ऋतू! – हवामानात झटपट बदल

पुण्यात नेमका कोणता ऋतू सुरू आहे, हा प्रश्न पडावा असे सध्याचे वातावरण आहे. कारण पुणेकरांनी गेल्या तीन-चार दिवसांत तीन ऋतू अनुभवले आहेत.

पुण्यात नेमका कोणता ऋतू सुरू आहे, हा प्रश्न पडावा असे सध्याचे वातावरण आहे. कारण पुणेकरांनी गेल्या तीन-चार दिवसांत तीन ऋतू अनुभवले आहेत. थंडीचा कडाका, पाठोपाठ उकाडा आणि आता ढगाळ पावसाळी वातावरण पुणेकर अनुभवत आहेत. शुक्रवारी तर कमाल तापमान २९ अंश आणि किमान १८.६ अंश अशी वैशिष्टय़पूर्ण पावसाळी हवा पुण्यात होती. शनिवारीसुद्धा असेच ढगांचे आवरण कायम असेल आणि पुढील आठवडय़ातही हवामानात असेच चढउतार होत राहतील, असा अंदाज वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
हवामानातील चढउतारामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाले आहेत. सध्या घशाचा संसर्ग आणि ताप यांची साथ सुरू आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला पुण्यात हिवाळा सुरू असावा असे वातावरण होते. सलग दोन दिवस (सोमवारी व मंगळवारी) किमान तापमान ९ अंशांच्या खाली होते. मंगळवारी तर ते ८.१ अंशांपर्यंत खाली उतरले. दुपारच्या तापमानातही घट झाली होती. मात्र, त्यानंतर लगेचच हवा फिरली. पाठोपाठ बुधवारी आणि गुरुवारी पुणेकरांनी उकाडा अनुभवला, दुपारी सूर्याचा चटका असा होता की उन्हाळ्याची आठवण व्हावी. गुरुवारी दुपारी तर तापमान ३३.१ अंशांवर पोहोचले. हिवाळा, उन्हाळ्याचे वातावरण अनुभवल्यानंतर शुक्रवारी पावसाळी हवा अनुभवायला मिळाली. सकाळ उजाडली ती आकाशात ढगांचे आच्छादन घेऊनच. सकाळी सूर्याचे दर्शन उशिरानेच झाले. या ढगांमुळे किमान तापमान तब्बल १८.६ अंशांपर्यंत वाढले. त्यानंतर ढगांमुळे पावसाळी हवा आणि काहीसे उबदार वातावरण दिवसभर अनुभवायला मिळाले. सायंकाळच्या वेळची आर्द्रता (हवेतील बाष्पाचे प्रमाण) सोमवारच्या तुलनेत दुपटीवर पोहोचली होती.
 
दिवस        कमाल तापमान    किमान तापमान    आद्र्रता (सायंकाळची)
सोमवार            २७.३            ८.८            २७ टक्के
मंगळवार            २९.२            ८.१            २९ टक्के
बुधवार            ३२.५            १०.३            २९ टक्के
गुरुवार            ३३.१            १३.६            ३६ टक्के
शुक्रवार            २९.०            १८.६            ५३ टक्के

 
बदलांचे कारण काय?
‘‘सध्या पश्चिमेकडील वारे व पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव आहे. हे दोन्ही प्रकारचे वारे महाराष्ट्रावर एकत्र आले आहे. ते एकमेकांशी भिडत असल्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ावर त्यांचा प्रभाव आहे. त्याआधी उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव म्हणून थंडी वाढली होती. त्यांचा प्रभाव कमी होऊन स्वच्छ आकाशामुळे दुपारचा उकाडा वाढला. आता ढगाळ वातावरण कायम आहे. हिमालयाच्या क्षेत्रात व उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारे वारे वाहत आहेत. ते वेगाने पुढे सरकत आहेत. ते एकापाठोपाठ एक असे येत आहेत. त्यामुळे हवामानात झपाटय़ाने बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.’’
– डॉ. सुनीता देवी, संचालक, पुणे वेधशाळा
 
पुढचे काय?
पुढील आठवडय़ातसुद्धा हवामानात चढ-उतार अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे एखाद्या ठिकाणी पावसाची हलकी सर पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या आठवडय़ात पुन्हा तापमानात चढ-उतार पाहायला मिळेल. तेव्हा एखाद्या दिवशी हलका पाऊससुद्धा पडू शकेल.
– पुणे वेधशाळा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Unexpected changes in weather since 3 days