पुणे : ‘सध्या प्रश्न विचारले की, लोकांच्या भावना दुखावतात. त्यामुळे विवेकाचा केवळ वैयक्तिक पातळीवर विचार करायला भाग पाडले जाते. प्रश्न विचारणारी पिढी निर्माण करण्याचे काम विद्यापीठांना करता येणार नाही, अशी व्यवस्था जाणीवपूर्वक तयार केली जाते. प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही यात कशाला पडता, असे सांगितले जाते. प्रस्थापित व्यवस्था, प्रस्थापित विचार आणि प्रस्थापित व्यवहारांना त्रास होऊ नये म्हणून ही व्यवस्था सशक्त केली जात आहे,’ असे मत राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी रविवारी व्यक्त केले.

‘विषारी प्रचार, अर्धवट आणि मतलबी माहितीतून लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने विद्यापीठे ज्ञान व्यवहारापासून दूर जात आहेत,’ असेही त्यांनी नमूद केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने आयोजित ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठा’च्या लोकार्पण सोहळ्यात पळशीकर बोलत होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ‘अंनिस’चे डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, श्रीपाल ललवणी, गणेश चिंचोले, दीपक गिरमे, डॉ. शैला दाभोलकर, मिलिंद देशमुख, प्रवीण देशमुख या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकरलिखित प्रा. राही डहाके यांनी इंग्रजी अनुवाद केलेल्या दहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

पळशीकर म्हणाले, ‘प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोंडी होत असते. एका बाजूला अवास्तव स्वप्ने आणि दुसऱ्या बाजूला बंद झालेले सगळे रस्ते, अशी कुंठित अवस्था प्रत्येकाच्याच आयुष्यात येते. त्यामुळे विवेकाचा पाठपुरावा करणे अशक्य होते. मात्र, त्याही पलीकडे व्यक्तिगत जीवनातील विवेकावर आक्रमण करणाऱ्या अनेक संस्था, संघटना, यंत्रणा आणि व्यवहार सतत सुरू असल्यामुळे विवेकशक्ती संपते. विवेकाचा विचार संपवण्यासाठी त्यांच्याकडून ज्ञानाचा आव आणणारा विषारी प्रसार केला जातो. अर्धवट माहिती सांगितली जाते.’

‘मी अभिनयाच्या क्षेत्रात काम करते. या क्षेत्राला असलेल्या वलयाचा उपयोग अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करेन,’ अशी भावना सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचा प्रसार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले.

प्रस्थापित सिद्धांतांना प्रश्न विचारणारी पिढीच समाज पुढे नेत असते. त्यासाठी धर्मचिकित्सा, विवेक, करुणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच कुतूहल आणि प्रश्न विचारण्याची मोकळीक आवश्यक आहे.प्रा. सुहास पळशीकर, राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक

डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठातील अभ्यासक्रम

‘या लोकविद्यापीठात वैज्ञानिक दृष्टिकोन, अंगात येणे, भुताने झपाटणे, भ्रामक वास्तुशास्त्र, छद्म विज्ञान, व्यसनमुक्ती या विषयांवर आधारित सहा अभ्यासक्रम मोफत शिकवण्यात येणार आहेत. तेरा वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना हे अभ्यासक्रम शिकता येतील. अधिक माहितीसाठी http://www.anisvidya.org.in या संकेतस्थळावर संपर्क करावा,’ असे आवाहन मुक्ता दाभोलकर यांनी केले.