केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परिक्षेत यश मिळवलेल्या ७५१ उमेदवारांपैकी १०० उमेदवार महाराष्ट्रामधील विविध भागातील आहेत. पुण्यातील औंध भागात राहणारी २४ वर्षीय मृणाली जोशी ही तरुणी देशात ३६ वी आणि राज्यात पहिली आली आहे. या यशाबद्दल लोकसत्ता डॉट कॉमच्या प्रतिनिधीने तिच्याशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना मृणाली जोशी म्हणाली की, केंद्रीय सेवेत जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते.तसे माझे देखील होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले असून आता मला महिलांसाठी काम करायला निश्चित आवडेल.

या काळात सोशल मीडियापासून दूर राहिले…

माझं पहिली ते दहावी पर्यंतचं शिक्षण अभिनव इंग्लिश मीडियममध्ये झालं. त्यानंतर पुढे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अकरावी आणि बारावी सायन्समध्ये केले. मात्र मला पुढे इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रात जायचे नाही असे तेव्हाच ठरविले होते. त्यामुळे पदवी पर्यंतच शिक्षण बीए इकॉनॉमिक्समधून घेतलं. तिथे देखील चांगले गुण मिळवले. इतर क्षेत्रात देखील यश मिळविले असते पण केंद्रीय सेवेत जाण्याचे बीएच्या पहिल्याच वर्षी निश्चित केले. त्यानुसार मी तयारी करण्यास सुरुवात केली. याबाबत आई-बाबांना कल्पना देखील दिली होती. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि खऱ्या अर्थाने माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्या प्रयत्नामध्ये मला यश मिळाले नाही. मात्र दुसर्‍या प्रयत्नात यश मिळाले.पहिल्या प्रयत्नात अपयश का आले, त्याची कारणे शोधून त्यावर काम केले. मी दररोज ८ तास अभ्यास आणि इतर वाचन करण्यावर भर दिला. मी सोशल मीडियावर आहे. मात्र या अभ्यासादरम्यान सोशल मीडियापासून दूर राहिल्याचे मृणालीने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपयशाने खचून जाऊ नका!

स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थीवर्गाची संख्या मोठी आहे. या परिक्षेत उत्तीर्ण न झाल्यास तो विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलायच्या घटना घडल्या आहेत. या घटना लक्षात घेता,विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून जाऊ नये. त्यांनी पुढील परिक्षेची निश्चित तयारी करावी. पण टोकाचे पाउल उचलू नये. यश मिळवण्यासाठी हे एकच क्षेत्र नाही. इतर क्षेत्रात देखील आपण यशस्वी होऊ शकतो, असा सल्ला मृणाली जोशी यांनी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थीवर्गाला दिला.