उरुळी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध नाही. मात्र यापुढे उरुळीत उघडय़ावर कचरा साठवू दिला जाणार नाही, या भूमिकेवर व त्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनावर ग्रामस्थ ठाम असून ३१ डिसेंबर नंतर कचरा डंपिंग बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उरुळी येथील कचरा डेपोच्या विरोधात १ जानेवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी शुक्रवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासमवेत महापौर तसेच आयुक्त कुणाल कुमार यांनी चर्चा केली. या चर्चेची माहिती पत्रकार परिषदेत देताना महापौर म्हणाले की, गावातील त्रेसष्ट जणांना महापालिकेत नोकरी देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. राज्य शासनाने तसे आदेशही दिले आहेत. मात्र या त्रेसष्ट जणांना प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी दिली जात असल्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला नोकरी देणे शक्य होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून या त्रेसष्ट जणांना सेवेत सामावून घेता येईल असा निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असून शासनाने विशेष बाब म्हणून सर्वाना नोकरीत घेण्याची अनुमती द्यावी, असे कळवले जाईल.
उरुळीत चालवल्या जात असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र, ३१ डिसेंबरनंतर उरुळीत उघडय़ावर कचरा साठवू दिला जाणार नाही, असेही या चर्चेत ग्रामस्थांनी सांगितले असून त्यानंतर आंदोलनाला सुरुवात केली जाईल, असाही इशारा दिला असल्याचे महापौर म्हणाले.