गरज असेल तितक्याच प्रमाणात विजेचा वापर करणे, ही आता काळाची गरज झाली आहे. संपुष्टात येणाऱ्या ऊर्जेचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारून प्रत्येकाने त्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ‘महापारेषण’चे मुख्य अभियंता प्रभाकर देवरे यांनी केले.
‘महावितरण’च्या वतीने रास्ता पेठ येथे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन केले होते. त्या वेळी देवरे बोलत होते. ‘महावितरण’चे मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता दत्तात्रेय कोळी, अनिल भोसले, भालचंद्र खंडाईत, अंकुश नाळे, सतीश चव्हाण आदी त्या वेळी उपस्थित होते.
देवरे यांनी इंधन बचतीवर सादरीकरण केले. त्याचप्रमाणे ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व सांगतानाच त्यातील तांत्रिक बाबीही स्पष्ट केल्या. ‘महावितरण’चे मुख्य अभियंता वाडेकर म्हणाले की, ऊर्जा संवर्धनाशिवाय आता पर्याय नाही. गरजेशिवाय विजेचा वापर करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. अस्तित्वात असलेल्या ऊर्जेचे योग्य संवर्धन केल्यास भविष्यातील पिढय़ांसाठी ती खऱ्या अर्थाने संपत्ती असेल.
कार्यक्रमात वीजसुरक्षा व बचत यावर माहितीपट दाखविण्यात आला. माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार, श्रीकांत बाबर, उदय साठे आदींनी ऊर्जा संवर्धनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर कोलते यांनी केले, तर उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी आभार मानले.