देशाच्या १२२ कोटी लोकसंख्येची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशातून कृषी उत्पादन वाढविणे हे आव्हान असून त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी व्यक्त केली.
अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित बारामती येथील कृषी विकास केंद्राच्या नव्या इमारतीचे तसेच कृषितंत्रज्ञानविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय कृषिराज्यमंत्री डॉ. चरणदास महंत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. डी. पी. त्रिपाठी, भारतीय कृषी संशोधन केंद्राचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. एस. अय्यप्पन, केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पशुसंवर्धनविषयक नव्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचेही उद्घाटन या प्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.
मुखर्जी म्हणाले, कृषी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. एकेकाळी अन्नधान्याची आयात करणारा आपला देश आता मोठय़ा प्रमाणावर निर्यात करीत आहे ही गोष्ट शेतकरी, कृषिशास्त्रज्ञ आणि देशासाठी अभिमानास्पद आहे. गेल्या वर्षी २५१ दशलक्ष टन उत्पादन झाले असून यंदाच्या वर्षी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून काढत २६२ दशलक्ष टन उत्पादन होईल. केवळ सर्वाधिक तांदूळ उत्पादन करणारा देश नाही तर सर्वाधिक निर्यात करणारा देश अशी भारताची ओळख झाली आहे. गहू, साखर आणि कापूस यांचीही निर्यात उल्लेखनीय अशीच आहे. दरडोई कमी होत जाणारी शेतीसाठीची जमीन आणि अपुरा पाणीसाठा अशा प्रतिकूलतेवरही मात करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहे.
भारताची वाढती लोकसंख्या आणि मर्यादित कृषी क्षेत्रात सर्वाना पुरेसे अन्नधान्य निर्माण करणे हेच शेतकऱ्यांसमोरचे मोठे आव्हान आहे. कृषी विद्यापीठे, शास्त्रज्ञ, संस्था आणि प्रगतशील शेतकरी यांनी संशोधन आणि कृषी विकासाचे हे आव्हान पेलण्याची कामगिरी करावी. बारामती येथील कृषी विकास केंद्राचे काम देशासाठी आदर्शवत आहे. कमी पर्जन्यक्षेत्र असलेल्या बारामती येथे शरद पवार यांच्या प्रेरणेने सुरू असलेले हे कार्य प्रेरक आहे, असाही गौरव मुखर्जी यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कृषी विकास केंद्रांनी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. जागतिकीरणानंतर वाढलेल्या क्रयशक्तीमुळे अधिक फलोत्पादन आणि कृषी उत्पादन हे सर्वासमोरचे आव्हान आहे. राज्यात ८२ टक्के कोरडवाहू शेती असून पाण्याचे योग्य व्यवस्थापन, ठिबक सिंचनाचा वापर आणि आंतरपीक योजनेची प्रभावी अंमलबजावणी यामुळे कृषी विकास शक्य होईल.
शरद पवार यांनी आपल्या भाषषणात या केंद्राच्या कार्याची माहिती दिली. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.
यूपीए आणि कृषिखाते
२००४ मध्ये निवडणुका झाल्यावर संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये (यूपीए-१) सहभागी होण्याचे सांगण्यासाठी प्रणव मुखर्जी आपल्या घरी आले होते. सरकारमध्ये आलात तर कोणते खाते पसंत कराल, असे त्यांनी मला विचारले तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता कृषिमंत्रालय स्वीकारेन असे सांगितले, या आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला. गेल्या दहा वर्षांत कृषी विभागाने केलेल्या प्रगतीचा विचार करता माझा निर्णय योग्य होता, असे पवार यांनी सांगितले. हा धागा पकडत प्रणव मुखर्जी यांनी सरकारमध्ये सहभागी होताना संरक्षण, गृह, परराष्ट्र अशी महत्त्वाची खाती सोडून पवार यांनी कृषी खाते मागितल्याचे मला आश्चर्य वाटल्याचे सांगितले. पण, ते योग्य होते असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी पवार यांचा गौरव केला.