आपल्याकडे संस्कृत भाषेचे अध्ययन आणि अध्यापनाचे महत्त्व आहे. पण, हा अभ्यास एका ठरावीक चाकोरीमध्येच होतो हे वास्तव नाकारता येणार नाही. संस्कृत ही काही विशिष्ट धर्माची किंवा जातीची भाषा नाही. तर, संस्कृत भाषेमध्ये हिंदूू, जैन आणि बौद्ध अशा विविध धर्मीयांनी दिलेल्या मोठय़ा योगदानाचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी व्यक्त केले.

[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]

संस्कृतमधील अभिजात आणि मध्ययुगीन साहित्याचा अभ्यास, लेखन आणि संशोधन क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याबद्दल डॉ. बहुलकर यांना साहित्य अकादमीतर्फे भाषा सन्मान जाहीर झाला आहे. पत्रकार भवन येथे बुधवारी (८ फेब्रुवारी) दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या शताब्दी वर्षांत हा सन्मान मिळत असल्याबद्दल मनामध्ये आनंदाची भावना असल्याचे बहुलकर यांनी सांगितले.

संस्कृत भाषेच्या अभ्यासामध्ये वैदिक संस्कृत, आर्श म्हणजे पाणिनीपूर्व संस्कृत (रामायण, महाभारत आणि पुराणे) आणि अभिजात संस्कृत असे विविध टप्पे आहेत. संस्कृत भाषेसंदर्भात बौद्धांनी साहित्य निर्मितीद्वारे दिलेल्या योगदानाचा मी गेली तीन दशके अभ्यास करीत आहे, असे सांगून डॉ. बहुलकर म्हणाले,की बौद्धांनी केवळ पाली भाषेतच रचना केल्या असा आपला गैरसमज आहे. पाली हीच प्रामुख्याने बौद्धांची भाषा असली तरी संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, प्राकृत मिश्र संस्कृत (बुद्धीस्ट संकर संस्कृत), तंत्रमार्ग म्हणजेच वज्रयान (इसवी सन पाचवे शतक ते १५ वे शतक) अशा वेगवेळ्या भाषांमध्येही त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे.

अर्थात हे संस्कृत पाणिनी नियमांनुसार नसले तरी त्याचे मोल काही कमी होत नाही. हा सखोल अभ्यास करण्यासाठी केवळ संस्कृतच नाही, तर पाली, प्राकृत, तिबेटन आणि चायनीज या भाषांची माहिती असावी लागते. संस्कृतमधील अनेक लुप्त झालेले साहित्य हे तिबेटी आणि चायनीज भाषेमध्ये आहे. अशा विविध टप्प्यांचा आणि संप्रदायांचा मी माझ्या कुवतीनुसार अभ्यास करीत आहे.

हिंदूी लेखक महापंडित राहुल सांकृत्यायन यांचे कार्य ही माझ्या अभ्यास आणि संशोधनाची प्रेरणा आहे. १९३५ मध्ये फारसे अर्थसाह्य़ नसताना आणि प्रवासाची साधने विकसित झालेली नसतानाच्या काळात त्यांनी तिबेटमध्ये जाऊन संस्कृत पोथ्या आणि हस्तलिखितांची छायाचित्रे काढून घेतली होती.

अशा शेकडो हस्तलिखितांच्या छायाचित्रांचा संग्रह त्यांनी पाटणा येथे आणून ठेवला. त्यामुळे संस्कृत वाङ्मयातील आपले संचित हे छायाचित्रांच्या माध्यमातून तरी अभ्यासासाठी उपलब्ध झाले आहे, असे बहुलकर यांनी या वेळी कृतज्ञतापूर्वक सांगितले.

[jwplayer K8f2NOFD-1o30kmL6]