‘‘तमाशातील गाण्यांपासून शास्त्रीय संगीतापर्यंतचे संगीत मला लहानपणापासून ऐकायला मिळाले. माझ्या वडिलांनी मला अभिजात संगीत ऐकण्याची सवय लावली. नव्या पिढीलाही अशी सवय लावणे आवश्यक आहे. आज टीव्हीवर जे काही चालते ते अभिजात नाही. हल्लीची गाणी थिल्लर असतात, अशी तक्रार नेहमी केली जाते. पण नव्या पिढीला बासुंदी खायला मिळाली तर ही मुले गुळाचे पाणी कशाला घेतील?’’ असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिक कलावंत संमेलनात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या हस्ते बाबासाहेबांना त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल ‘वाग्यज्ञे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर कला क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना ‘वाग्यज्ञे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वाडकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या वतीने संगीतकार राहुल घोरपडे यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे उपस्थित होते.
बाबासाहेब म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांना संगीत व नाटके यांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे बालगंधर्वापासूनची गाणी ऐकण्याची संधी मला मिळाली. त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास होता. बोटाला धरून त्यांनी मला किल्ले दाखवले. माझ्या जडणघडणीचे श्रेय माझे वडील व शिक्षक यांचे आहे. हल्ली चांगले शिक्षक मिळणे हा नशिबाचा भाग झाला आहे; तर संस्कार करण्याचे काम टीव्हीवर सोपवण्यात आले आहे.’’
कात्रज जवळील आंबेगाव येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा एक भाग ९ कोटी रुपये खचून पूर्ण झाल्याचे बाबासाहेबांनी सांगितले. ‘‘शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, त्यांची मूळ समकालीन चित्रे, त्या काळातील शालू, शेले अशी वस्त्रे, तलवारी व भाल्यांसारखी शस्त्रे या गोष्टी या ठिकाणी पाहता येणार आहेत. तसेच शिवाजी महाराजांसंबंधीचे सर्व भाषांमधील साहित्य आणि सर्व ऐतिहासिक पुरावे एकत्र करण्याचा माझा प्रयत्न आहे. इतिहासाचे अभ्यासक तिथे येऊन अभ्यास करू शकतील,’’ असेही ते म्हणाले.
चपळगांवकर म्हणाले, ‘‘इतिहास हा कुठल्याही जातीधर्माचा नसतो. तो मानवजातीचा असतो. त्यामुळे त्याचा डोळसपणे विचार व्हायला हवा. कलांचा एकमेकांशी संबंध असतो; परंतु आज विनाकारणच कलांची विभागणी केली जाते. संगीताचा साहित्याशी असलेला संबंध हल्ली तुटला आहे. तर, इतिहासलेखनाला साहित्यच समजले जात नाही.’’