Vaishnavi Hagawane death case वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पहाटे राजेंद्र हगवणे (वैष्णवीचे सासरे) आणि सुशील हगवणे (वैष्णवीचा दिर) या दोघांना अटक केली. त्यानंतर आता या दोघांच्या अटकेआधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघंही सात दिवसांपासून फरार होते. त्यांना आज पहाटे अटक करण्यात आली.
काय दिसतं आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये?
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हॉटेलमध्ये मित्रांसह बसून जेवत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे फुटेज १७ मे रोजीचं आहे. १६ मे रोजी वैष्णवीने आयुष्य संपवलं त्यानंतर फरार झालेले सुशील आणि राजेंद्र हगवणे मित्रांसह हॉटेलमध्ये जेवतानाचं हे फुटेज आहे. तळेगाव येथील हॉटेलमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे असं सांगितलं जातं आहे.
१६ मे रोजी वैष्णवी हगवणेची आत्महत्या
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. तिच्या लग्नाला तिच्या वडिलांनी विरोध दर्शवला होता. मात्र वैष्णवीने शशांकशीच लग्न करायचं असा हट्ट धरला होता.
वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?
वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक आणि नणंद करिश्मा हगवणे अटकेत आहेतच आता तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.