Vaishnavi Hagawane Death पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची राज्यभरात होते आहे. या प्रकरणावर बुधवारी पुणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करीश्मा व सासू लता या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. आता वैष्णवीच्या वडिलांनी त्याबाबत उत्तर दिलं आहे.
हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी काय सांगितलं?
“वैष्णवीच्या फोनमध्ये आक्षेपार्ह चॅट्स व इतर आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या होत्या”, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. बुधवारी सुनावणी पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी वैष्णवीवर आरोप केले. तसेच पतीने रागाच्या भरात पत्नीला मारणे हा काही कौटुंबिक हिंसाचार ठरत नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे काय म्हणाले?
वैष्णवीच्या मोबाइल चॅटबाबत मला हगवणे कुटुंबाने कुठलीही माहिती दिलेली नाही. वैष्णवी हयात नाही आणि आता तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला आहे. मोबाइल मी काढून घेतला वगैरे नाही. मी माझ्या मुलीला मोबाइल दिला आहे तर शशांकला दीड लाखांचा मोबाइल घेऊन दिला कारण त्याने त्या मोबाइलची मागणी केली होती. वाकड येथील क्रोमा या ठिकाणी शशांक आला, माझ्या मुलीला (वैष्णवी) बोलवून घेतलं. तिथे त्याने वैष्णवीकडे मागणी केली की तुझ्या पप्पांना सांग मला मोबाइल हवा आहे. मला वैष्णवीने फोन करुन तिथे बोलवून घेतलं. तो मोबाइल मी शशांकला घेऊन दिला. १८ सप्टेंबर २०२४ ला मोबाइल घेऊन दिला. त्या मोबाइलचे हप्ते आजही मी भरतो आहे. असं वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी माध्यमांना सांगितलं.
माझ्याशी वाद घालून, भांडण करुन हुंडा घेतला आहे-अनिल कस्पटे
“हुंड्यासाठी छळ केला नाही, गाडी मागितली नाही म्हणता तर मग मी एमजी हॅक्टर गाडी बुक केली होती. ती मी रद्द केली कारण त्यांनी वाद घालून फॉर्च्युनर मागून घेतली. बैठकीत वादावादी झाली होती फॉर्च्युनरच हवी असा हट्ट धरला होता. त्यांच्याकडे ही एकच कार आहे. जी काही ९० लाखांची गाडी आहे सांगत आहेत ती चंद्रकांत हुचडे नावाने आहे. हगवणे कुटुंबाकडे कुठलीही गाडी नाही. माझ्याकडे कार मागितली, लग्नाला उभं राहणार नाही, लग्नातून निघून जाईन अशा धमक्या देऊन माझ्याकडून सगळा हुंडा घेतला आहे. अधिक महिन्यात जावयाला चांदीचं ताटच पाहिजे असाही हट्ट धरला होता तो पण मी पूर्ण केला.” असंही अनिल कस्पटे म्हणाले.

वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिला पाच ते सहा दिवस मारहाण झाली
वैष्णवीला पाच ते सहा दिवस मारहाण सुरु होती. वैष्णवी १० मे रोजी जेव्हा इथे आली होती तेव्हा तिने आईलाही ही बाब सांगितली होती की तिला मारहाण केली जाते आहे. तिचा छळ होत होता. त्यानंतर ११ मे रोजी तिला फोन आला त्यामुळे तिला जावं लागलं. माझ्या मुलीवर ते काहीही शिंतोडे उडवतील. वकिलांना मी इतकंच सांगेन की तुम्ही सूज्ञ आहात. माझी मुलगी तर गेली आता माझ्या मुलीवर अशा प्रकारे शिंतोडे उडवू नका. माझी एवढीच त्यांना विनंती आहे, असं अनिल कस्पटे यांनी म्हटलं आहे.