येरवडा येथील नियोजित सलीम अली पक्षी अभयारण्यात सध्या मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून अनेक झाडे कापण्याची तयारी तेथे सुरू असल्याचे दिसत आहे. ही वृक्षतोड तातडीने थांबवून तेथे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी तसेच अन्यही प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी बुधवारी आयुक्तांकडे केली.
‘‘विशिष्ट हंगामात केवळ देशी नव्हे, तर विदेशी पक्षीही ज्या ठिकाणी स्थलांतरित होऊन येतात असे पक्षी अभयारण्य पुणे परिसरात असून आजही तेथे गर्द वृक्षराजी आहे. मात्र तेथे वृक्षतोड होत असल्याची माहिती समजल्यानंतर मी तेथे जाऊन समक्ष पाहणी केली. त्यावेळी या परिसरात वृक्षतोड सुरू होती. तसेच अनेक झाडे कापण्याची तयारी सुरू असल्याचेही जागेवर दिसले. कापलेली अनेक झाडेही तेथे पडली असून शेजारच्या लक्ष्मीनगर येथील अनेक नागरिक वृक्षतोड करत होते, असे वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या ठिकाणी महापालिकेकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे सर्वत्र कचरा साठल्याचेही दिसत आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर राडारोडा पडलेला आहे,’’ असेही त्या म्हणाल्या.
येथे सुरू असलेली वृक्षतोड तातडीने थांबवण्यासाठी महापालिकेने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी तसेच कचरा व राडारोडा उचलून घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. त्याबरोबरच या उद्यानातील वृक्षगणनेचे काम हाती घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. साडेनऊ हेक्टर एवढय़ा जागेवर हे अभयारण्य विकसित केले जाणार असून त्यातील निम्मी जागा वन विभागाची आहे. मालकांकडून उर्वरित जागा संपादित करण्यासाठी महापालिकेकडून प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीचे आठ कोटी रुपये महापालिकेने शासनाकडे जमा केले आहेत आणि आणि आणखी आठ कोटी रुपये जमा करणे बाकी आहे.
आगामी वर्षांच्या अंदाजपत्रकातही या अभयारण्यासाठी तरतूद करून या जागेवर चांगले वन विकसित करण्याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.