पुणे : ‘वंदे मातरम्’ या दोन शब्दांनी भारलेल्या मंत्राने भारत देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण करत कॅनव्हासवर चितारलेल्या नावीन्यपूर्ण चित्रकृतींद्वारे ‘वंदे मातरम्’ गीताची पूजा बांधण्यात आली. यानिमित्ताने चितारण्यात आलेल्या १८० चित्रांचा समावेश असलेले हे अनोखे चित्रप्रदर्शन मंगळवारी (११ नोव्हेंबर) पुणेकरांसाठी खुले असेल.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षपूर्तीनिमित्त आर्ट इंडिया फाउंडेशन, वंदे मातरम् सार्ध शती जयंती समारोह समितीतर्फे ‘वंदे मातरम्’ कलाकृतींमधून देशप्रेम व्यक्त करणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, ‘वंदे मातरम्’चे अभ्यासक मिलिंद सबनीस, इतिहास संकलन समितीचे अरुणचंद्र पाठक, आर्ट इंडिया फाउंडेशनच्या संचालिका डॉ. प्राची साठे, विश्वस्त चित्रा वैद्य या वेळी उपस्थित होत्या. भारतासह विविध देशांतून तब्बल अडीच हजारांहून अधिक कलाकारांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला होता. बालगंधर्व कलादालन येथे मंगळवारपर्यंत (११ नोव्हेंबर) सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनासाठी प्रमोद, परिमल चौधरी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे.
बलकवडे म्हणाले, ‘क्रांतिकारकांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे ‘वंदे मातरम्’ हे प्रेरणागीत होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा संघर्ष जसा व्यक्त होत आहे त्याचप्रमाणे भविष्यातील भारत कसा असेल याचेही प्रतिबिंब प्रदर्शनात उमटले आहे. ‘वंदे मातरम्’ या गीताची चित्रांच्या माध्यमातून लहान-थोरांनी पूजाच मांडली आहे. देशाची वाटचाल कशी झाली हे चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या आदर्श संस्कृतीचेही दर्शन घडत आहे. सातासमुद्रापार असलेल्या युवकांकडूनही देशभक्तीची भावना व्यक्त होत आहे.’
‘अनेक गीतांना इतिहास असतो. परंतु, ‘वंदे मातरम्’ या गीताने इतिहास घडविला आहे’, असे सांगून चारुहास पंडित यांनी देशाचे भवितव्य बालक-युवकांच्या हाती सुरक्षित आहे, हे अर्कचित्र रेखाटून स्पष्ट केले. ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे गीत मृणाल वेर्णेकर यांनी सादर केले. माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या दीडशेव्या वर्ष पूर्तीनिमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भारतासह विविध देशांतून अडीच हजारांहून अधिक चित्रकारांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्यांना उद्घाटन समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. – चित्रा वैद्य, विश्वस्त, इंडिया आर्ट फाउंडेशन
