पुणे : ‘स्वातंत्र्य म्हणजे संधी आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी’ असे पहिल्या संपादकीय लेखात नमूद करणाऱ्या साने गुरुजी यांनी स्थापन केलेले व वैचारिक आणि परिवर्तनवादी नियतकालिक अशी ओळख असलेले ‘साधना साप्ताहिक’ यंदाच्या स्वातंत्र्यदिनी अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. आता पंचाहत्तरीकडून शताब्दीकडे वाटचाल करण्याची भक्कम पायाभरणी म्हणून युवा पिढीला डोळय़ासमोर ठेवून अनेक डिजिटल प्रकल्प हाती घेतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय राज्यघटनेतील मूल्यांचे संवर्धन करीत प्रबोधन, रचना आणि संघर्ष या तीनही क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था-संघटनांना बळ देण्याचे काम करणारे ‘साधना साप्ताहिक’ सोमवारी (१५ ऑगस्ट) अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे प्रमुख पाहुणे असून, साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती साधना ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सुहास पळशीकर आणि संपादक विनोद शिरसाठ यांनी बुधवारी  दिली. शिरसाठ म्हणाले, की अमृतमहोत्सवी कार्यक्रमात १९७२ ते २०२२ या पन्नास वर्षांतील ‘डिजिटल अर्काइव्ह’चे उद्घाटन होणार आहे. ५० वर्षांत  प्रकाशित झालेले अडीच हजार अंक  weeklysadhana.in संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या २५ वर्षांचे अंक अशाच स्वरूपात  वर्षभरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ‘साधना प्रकाशन’च्या  sadhanaprakashan.in या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन या कार्यक्रमात होणार आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various activities throughout the year in sane guruji sadhana amrut mahotsav zws
First published on: 11-08-2022 at 03:58 IST