मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत ३ मेपर्यंत मुदत दिली होती. असं असलं तरी अद्यापही पुणे शहरातील अनेक मशिदींवर भोंगे दिसत आहेत. ते काढले जावे, यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज (१० मे) पोलीस आयुक्तांची भेट घेतली, पण त्यावेळी शिष्टमंडळामधील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यामध्ये संवाद दिसून आला नाही. त्याबाबत वसंत मोरे यांना विचारले असता ते म्हणाले, “एकला चलो रे असलो, तरी तो पक्षातच आहे. तो पक्षाच्या बाहेर नाही,” अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत ३ मेंपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर राज्यातील अनेक भागात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अद्यापही पुणे शहरातील मशिदीवर भोंगे आहेत, असं म्हणत पुणे शहरातील मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. भेटीसाठी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागसकर, हेमंत संभूस, रणजीत शिरोळे, बाळा शेडगे, गणेश सातपुते हे पोलीस आयुक्त कार्यालयात ११ वाजून ४० मिनिटांनी पोहचले. मात्र त्या शिष्टमंडळासोबत वसंत मोरे नव्हते. त्यामुळे अद्यापही वसंत मोरे शहरातील पदाधिकाऱ्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

“गाडी लावण्यास जागा न मिळाल्याने आतमध्ये येण्यास उशीर”

काही वेळातच वसंत मोरे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आले. त्यानंतर शिष्टमंडळ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देऊन बाहेर आले, पण त्यांच्यासोबत वसंत मोरे नव्हते. यावर वसंत मोरे म्हणाले, “मी शिष्टमंडळासोबत आलो आहे. आमच्या कोअर कमिटीच्या ग्रुपवर मेसेज आला होता. तो पाहून मी आज आलो आहे. मला बाहेर गाडी लावण्यास जागा मिळाली नाही. म्हणून आतमध्ये येण्यास वेळ लागला.”

“एकला चलो ते असला, तरी पक्षातच आहे, पक्षाच्या बाहेर नाही”

“एकला चलो ते असला, तरी तो पक्षातच आहे. तो पक्षाच्या बाहेर नाही. मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की, राज साहेब ठाकरे विचारांचा अथांग महासागर आहे. त्याला अनेक नद्या, नाले येऊन मिळतात. त्यातील काही खळखळणारे असतात. यातील मी एकजण आहे. तसेच माझी सुरुवातीपासून वाट वेगळीच राहिलेली आहे. माझं उद्दिष्ट, ध्येय पक्ष वाढविणे हेच राहिले आहे. माझ्याकडे तीन प्रभागांचे नियोजन दिल्यास मी ९ नगरसेवक निवडून आणले आणि जेव्हा शहराध्यक्ष पदाची धुरा माझ्याकडे होती. त्यावेळी शहरात मनसेचे २५ नगरसेवक निवडून येतील असे ध्येय ठेवले होते,” असेही वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : “एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा…”, ‘छटी का दुध याद दिलाएंगे’ म्हणत राज ठाकरेंना महंतांचा इशारा

पुण्यातील मनसे नेत्यांसोबत संवाद आहे का? ‘नाही’ उत्तर देत वसंत मोरे म्हणाले…

तुमचा शहरातील नेत्यांसोबत संवाद होत आहे का? असा प्रश्न विचारला असता वसंत मोरे यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. ते म्हणाले की, मी केवळ गणेश सातपुते यांना फोन केला होता. त्यांच्यासोबत चर्चा करून आल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्या दौर्‍याबाबत शहर पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. तुम्ही शहर कार्यालयामध्ये जाणार का? अशीही विचारण त्यांना करण्यात आली. वसंत मोरे म्हणाले की, शहर कार्यालयात बैठक असल्यास मी जाणार नाही. पण बाहेर कुठे असल्यास जाणार आहे. शहर कार्यालयामध्ये राज ठाकरे आल्यास निश्चित जाणार आहे.