आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या आणि प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना यंदाचा ‘वत्सलाबाई जोशी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका वत्सलाबाई जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार मंडळातर्फे दिला जात असून या पुरस्काराचे यंदा दहावे वर्ष आहे. यापूर्वी पं. माधव गुडी, पं. विजय सरदेशमुख, पं. अजय पोहनकर, पं. सत्यशील देशपांडे, पं. राजा काळे आणि गायिका पद्मा तळवलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शुक्रवारी (१२ डिसेंबर) आरती अंकलीकर-टिकेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि नंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या गायनशैलीवर या दोन्ही गुरुंचा प्रभाव जाणवतो. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी देश-परदेशात झालेल्या प्रतिष्ठित संगीत महोत्सवात आपली कला सादर केली असून श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘सरदारी बेगम’ चित्रपटासाठी पाश्र्वगायन केले आहे. पं. कुमार गंधर्व, पं. जसराज पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.