१३०० कोटींचा महसूल, पण प्रमाणपत्रासाठी ‘आरटीओ’त कागद नाही
प्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्या वाहनाची नोंदणी झाल्यानंतर नोंदणीचे प्रमाणपत्र दोन ते तीन महिन्यात टपालाने पाठविले जाईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना दोन किंवा तीन महिने नव्हे, तर तब्बल वर्षभराची फरफट सहन करावी लागत आहे. टपाल खात्याची सुविधाही फोल ठरली असल्याने घरपोच प्रमाणपत्र देण्याच्या व्यवस्थेचे पैसे भरूनही नागरिकांना आरटीओ आणि टपाल कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. गंभीर बाब म्हणजे वर्षांला सुमारे तेराशे कोटी रुपयांचा महसूल देणाऱ्या पुणे आरटीओत प्रमाणपत्रासाठी पुरेसा कागद उपलब्ध होत नाही.
वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयात न देता ते संबंधित वाहन मालकाला टपालाने घरपोच पाठविण्याचा निर्णय परिवहन विभागाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार नव्या वाहनांची नोंद केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र टपालाने येईल, असे आजही सांगितले जाते. प्रत्यक्षात बहुतांश वाहन मालकांना हे प्रमाणपत्र मिळतच नाही. तीन ते चार महिने वाट पाहिल्यानंतर संबंधित व्यक्ती याबाबत चौकशीसाठी आरटीओ कार्यालयात येते. मात्र, प्रमाणपत्राबाबत टपाल कार्यालयाकडे चौकशी करा, असे सांगितले जाते. टपाल कार्यालयात गेल्यानंतर आरटीओकडून प्रमाणपत्र पाठविल्याचा क्रमांक आणा, असे उत्तर दिले जाते. बहुतांश वेळेला आरटीओतून प्रमाणपत्र पाठविलेच गेलेले नसते. अजून काही दिवस लागतील, असे सांगितले जाते. त्यातून अनेकदा वाहनाची नोंदणी होऊन वर्ष उलटते तरीही नोंदणी प्रमाणपत्र हाती लागत नसल्याचा अनुभव अनेकजण सांगत आहेत.
वर्ष उलटूनही नोंदणी प्रमाणपत्र न मिळाल्याने पुन्हा आरटीओचे हेलपाटे मारण्याची वेळ येते. सातत्याने पाठपुरावा केला तरच नोंदणी प्रमाणपत्र तयार होते. पण, वेगवेगळ्या टेबलांवर फिरून त्यावर स्वाक्षऱ्या घेण्याचे काम संबंधित वाहन मालकालाच करावे लागते. मुख्य म्हणजे आरटीओ व टपाल कार्यालयात फेऱ्या मारून संबंधिताला वेळ व पैसा खर्च करावा लागत असताना प्रमाणपत्र टपालाने पाठविण्याचे शुल्क मात्र घेतले जाते.
यंत्रणा अपुरी
पुण्यात रस्त्यावर येणाऱ्या नव्या वाहनांची संख्या पाहता, त्या तुलनेत आरटीओची यंत्रणा नाही. महत्त्वाची बाब म्हणजे वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणारा कागद आरटीओ कार्यालयाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. कागदाअभावी प्रमाणपत्र तयार होत नसल्याने हजारो प्रमाणपत्रांचे वितरण शिल्लक राहिले आहे. त्यात रोजच शेकडो प्रमाणपत्राची भर पडते आहे. दसऱ्याला मोठय़ा प्रमाणात वाहनांची खरेदी झाली. शिल्लक प्रमाणपत्रांमध्ये आता नव्या वाहनांच्या प्रमाणपत्रांचीही भर पडली आहे. त्यामुळे यंदाच्या दसऱ्याला वाहनाची नोंद झाली असल्यास पुढच्या दसऱ्यानंतरच प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.