पिंपरी : भोसरी येथे अल्पवयीनासह दोन जणांनी रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या १२ मोटारी व एका टेम्पोची दगड आणि कोयत्याने तोडफोड केली. ही घटना रविवारी (२० एप्रिल) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

याप्रकरणी करण बाळू ससाणे (वय २०, रा. फुलेनगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. तर, त्याच्या १७ वर्षांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. अमरसिंह मनबहादूर थापा (वय ४७, रा. सुखवानी बाग हौसिंग सोसायटी, आदिनाथनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थापा हे सुखवानी बाग सोसायटीत रखवालदार आहेत. गव्हाणे वस्ती – आदिनाथनगर रस्त्यावर सुखवानी बाग सोसायटी आहे. सोसायटीतील, तसेच आजूबाजूचे रहिवासी आपले वाहन या रस्त्याकडेला उभे करतात. रविवारी मध्यरात्री एक ते सव्वाच्या दरम्यान करण आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हातात कोयता घेऊन आले.

दगड आणि कोयत्याने त्यांनी रस्त्याकडेला उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांनी १२ मोटारी आणि एका टेम्पोची काच फोडली. सोसायटीचे रखवालदार थापा यांनी आरडाओरडा करून आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्या दिशेने वीट फेकून मारली. थापा बाजूला सरकल्याने बचावले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

रहिवाशांनी तत्काळ हा प्रकार भोसरी पोलिसांना कळविला. फौजदार सुहास खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. गुन्हे शाखेच्या गुंंडाविरोधी पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपी सराइत आहेत, की नाही याची माहिती घेतली जात आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणाने ही तोडफोड केली, याबाबत चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.