पुणे : ‘विनोद आणि विसंगती अनेक वर्षांपासून असली, तरी अर्थपूर्ण विसंगती टिपणे हाच व्यंगचित्राचा आत्मा आहे,’ असे प्रतिपादन शतकपूर्तीकडे वाटचाल करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी शनिवारी केले.
‘कागदापासून सुरू झालेला व्यंगचित्रांचा प्रवास आता आयपॅड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत येऊन ठेपला असला, तरी सर्जनात्मक पातळीसाठी कागदावरच व्यक्त व्हावे लागते. सर्जनाच्या पातळीवर मानवी क्षमता विलक्षण आहे. सहानुभूती आणि सहवेदना यांसारख्या भावना कृत्रिम बुद्धिमत्तेत रुजवता येत नाहीत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस मंगळवारी (२९ जुलै) वयाची शंभर वर्षे पूर्ण करीत आहेत. हे औचित्य साधून क्लब वसुंधरा आणि कार्टूनिस्ट्स कम्बाइन यांच्या वतीने रविवारपासून (२७ जुलै) ‘शि. द. १००’ हा तीन दिवसांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या पूर्वसंध्येला फडणीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या प्रसंगी ते बोलत होते. महोत्सवाचे निमंत्रक राजकुमार चोरडिया, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, चारुहास पंडित आणि झपुर्झा केंद्राचे प्रमुख सुनील पाठक या वेळी उपस्थित होते.
फडणीस म्हणाले, ‘व्यंगचित्र ही स्वतंत्र भाषा आहे. तिचे बलस्थान ओळखून मी शब्दविरहित चित्रांकडे वळालो. माझी व्यंगचित्रे राज्य आणि देशाबाहेरही स्वीकारली गेली. याचाच अर्थ व्यंगचित्रांना कसलीही सीमा नसते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून आगरकरांपर्यंत अनेकांनी महाराष्ट्राची वैचारिक नांगरणी केलेली आहे. त्यामुळे व्यंगचित्रांमधून व्यक्त झालेला भाव समजून घेणे महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सहज सोपे होते. अलीकडे व्यंगचित्रांमधून व्यक्त होणे कठीण झाले असून, नेते आणि भक्तगण एखादे व्यंगचित्र कसे स्वीकारतील, याचा अंदाज बांधता येत नाही.’
‘एका मर्यादेनंतर व्यंगचित्रे माझ्यापुढे काय आव्हाने ठेवतील, असा प्रश्न मला पडायचा. मात्र, सर्जनाच्या पातळीवर व्यंगचित्र आजही मला आव्हान देत असते. ‘हंस’च्या अंतरकरांनी माझ्यातील व्यंगचित्रकार हेरला आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कलेकडे मी गांभीर्याने पाहू लागलो. आपल्याला कोणतेही वलय नसताना एखादा संपादक सर्जनशील व्यंगचित्रकलेची आबाळ करू नकोस, असा सल्ला देतो, त्या वेळी आपण गांभीर्याने विचार करणे भाग असते. आमच्या काळाच्या तुलनेत आताच्या काळात कलादालनाच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असून, कलेच्या दृष्टीने हे आशादायी चित्र आहे,’ असेही फडणीस यांनी सांगितले.
व्यंगचित्र म्हणजे राजकीय टीकाचित्र असा आपल्याकडे गैरसमज आहे. राजकीय टीकाचित्र असते तेव्हा ती लोकशाहीची भाषा होते. सामाजिक हास्यचित्रे येतात, तेव्हा ती ज्ञानाची भाषा होते. एका मर्यादेपलीकडे मी काम करू शकीन, असे वाटले नव्हते. पण, चित्रांनीच मला विषय सुचविले. समाजातील विसंगती आणि प्रश्न झोळीत येत असतात. पण, ते सारे चित्रांतून मांडण्यासाठी माझी झोळी लहान आहे. – शि. द. फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार