scorecardresearch

पाच युवा रंगकर्मीना विनोद दोशी शिष्यवृत्ती जाहीर

पाच युवा रंगकर्मीना यंदाची विनोद दोशी शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. प्रत्येकी एक लाख रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे संदीप शिखर, विक्रांत ठकार, प्रवीण काळोखे, निम्मी राफेल आणि कल्याणी मुळे या पाच युवा रंगकर्मीना यंदाची विनोद दोशी शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. प्रत्येकी एक लाख रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीचे यंदा ११ वे वर्ष असून यापूर्वी ४७ कलाकार या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत.
पंडित फाम्र्स येथे २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या अनौपचारिक कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलासंपादक आणि ज्येष्ठ समीक्षक सदानंद मेनन यांच्या हस्ते या रंगकर्मीना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. विनोद आणि सरयू दोशी फाउंडेशनतर्फे या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी प्रतिष्ठानला पाच लाख रुपयांची देणगी मिळते. शिष्यवृत्तीची एक लाख रुपयांची रक्कम कलाकारांना बारा धनादेशाद्वारे दिली जाते. त्यामुळे कार्यपद्धतीमध्ये कोठेही दिरंगाई न होता कलाकारांना मासिक खर्चासाठी हातभार लागतो. ही शिष्यवृत्ती कलाकाराला विनाअट दिली जाते. त्यासाठी कोणताही अर्ज करावा लागत नाही. कलेच्याप्रती समर्पित वृत्तीने काम करण्याची इच्छा आणि सक्रिय सहभाग असणारे, नाटय़चळवळीत कार्यरत असलेले कलाकार या पुरस्कारासाठी पात्र ठरतात. नाटय़सृष्टीत महत्त्वाचे काम करणाऱ्यांना मदत म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम खर्च करण्यास कोणतीही मर्यादा नसून कलाकार आपल्या इच्छेनुसार ही रक्कम खर्च करू शकतात. त्याचप्रमाणे या शिष्यवृत्ती रकमेच्या खर्चाचा हिशेब देणेही कलाकारावर बंधनकारक नाही, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त अशोक कुलकर्णी यांनी बुधवारी दिली. प्रसिद्ध दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत आणि मोहित टाकळकर या वेळी उपस्थित होते.
गेल्या वर्षीपर्यंत केवळ महाराष्ट्रातील रंगकर्मीची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जात होती. या वर्षी देशाच्या विविध प्रांतातील रंगकर्मीचाही विचार करण्यात आला असून शिष्यवृत्तीची कक्षा राष्ट्रीय स्तरावर रुंदावली आहे. पाँडेचरीची निम्मी राफेल ही मोहिनीअट्टम आणि कुचिपुडी नृत्यांगना असून ‘आदिशक्ती’ या नाटकातील तिची भूमिका गाजली आहे. कर्नाटकातील धनबाद येथील दस्तक सांस्कृतिक मंच या संस्थेतून कारकीर्द सुरू करणारा संदीप शिखर हा अभिनेता आणि नाटककार आहे. दिग्दर्शक प्रवीण काळोखे नाशिक येथील आहे. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाची (एनएसडी) विद्यार्थिनी असलेली कल्याणी मुळे ही मुंबईची असून तिने विविध प्रायोगिक नाटकांतून भूमिका केल्या आहेत. तर, पुण्याचा विक्रांत ठकार हा ‘लाइट्स डिझायनिंग’मध्ये सातत्याने प्रयोग करणारा असून त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘अतिरेकी’ नाटकाने राज्य नाटय़ स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळविले आहे, असेही अशोक कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vinod doshi scholarships

ताज्या बातम्या