शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

द्वैभाषिक पुस्तक खरेदी योजनेमध्ये अधिकाधिक प्रकाशकांना सहभाग घेता यावा यासाठी तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली.

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस (१५ ऑक्टोबर) हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून राज्य शासन यंदाही साजरा करीत आहे. शालेय स्तरावर वाचन संस्कृती वाढीस लावण्याच्या उद्देशातून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना सरकारतर्फे वाचनासाठी मोफत पुस्तके पुरविण्यात येणार आहेत. त्या संदर्भात नुकतीच एक निविदा काढण्यात आली असून त्यामधील अटी जाचक असल्याची तक्रार प्रकाशक परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने केली आहे.

प्रकाशकांनी केलेल्या मागणीनुसार या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. या संदर्भात काढण्यात आलेल्या निविदेनुसार प्रकाशकांना पुस्तके प्रकाशित करून पुरविण्यासाठीचा कालावधी कमी आहे. या मुदतीमध्ये पुस्तके प्रकाशित करणे अशक्य आहे. त्यामुळे या योजनेची मुदत वाढविली तर अधिकाधिक प्रकाशकांना सहभाग घेता येईल आणि सरकारचा पैसादेखील वाचेल. त्यामुळे प्रकाशकांनी केलेल्या विनंतीची दखल घेत या योजनेला १५ ते २० दिवसांपुरती स्थगिती देण्यात आल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

द्वैभाषिक पुस्तक खरेदी योजना अत्यंत फसवी असून त्यातील अटी जाचक स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या योजनेचा पुनर्विचार करून त्यामध्ये योग्य सुधारणा करून मगच ही योजना राबवावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने शुक्रवारी केली. राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर, ज्योत्स्ना प्रकाशनचे मिलिंद परांजपे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी पत्रकार परिषदेमध्ये या योजनेतील त्रुटींवर बोट ठेवले. त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांना निवेदनही सादर केले आहे.