पुणे : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली.त्या सर्व घडामोडी दरम्यान अजित पवार हे पुणे दौर्‍यावर आले होते.त्यावेळी हडपसर विधानसभा मतदार संघात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या व्यासपीठावरील फ्लेक्सवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा लोगो नाही.मात्र अजित पवारांच्या पार्टीचा पिंक कलर सर्वत्र वापरण्यात आला आहे.तर या कार्यक्रमाला शासना मधील सर्व अधिकारी उपस्थित आहे.यामुळे हा कार्यक्रम शासनाचा की पक्षाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.त्या कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले,सर्वसामान्य लोकांना त्रास होत असतो.

अशा कार्यक्रमामधून प्रश्न सुटायला मदत होत असते.त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठून तरी सुरुवात करायची असते म्हणून हडपसरमधून सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.तर अंजना कृष्णा यांच्या बाबत प्रश्न विचारताच अजित पवारांनी उत्तर देण टाळल्याचे पाहण्यास मिळाले.