स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून विश्व साहित्य संमेलन अंदमानला घेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले विश्व साहित्य संमेलन ‘ऑफबीट’ करण्याच्या निर्णयावर मात्र गुरुवारी (२ जुलै) शिक्कामोर्तब होणार आहे.
केवळ मराठी प्रांतापुरता विचार न करता जगभरातील मराठी माणसांचा स्नेहमेळावा, या उद्देशातून विश्व साहित्य संमेलन ही संकल्पना आकाराला आली. अमेरिकेतील सॅनहोजे, दुबई आणि सिंगापूर अशी तीन संमेलने झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला विश्व साहित्य संमेलन घेण्यामध्ये अपयश आले. त्यानंतर टोरँटो येथे निश्चित झालेले संमेलन संयोजकांना आर्थिक निधी संकलित न करता आल्यामुळे रद्द झाले. तर, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ठरलेले संमेलन साहित्य महामंडळाने आधी सरकारकडून निधी मिळवून दिला तरच होईल, अशी अट संयोजकांनी घातल्यामुळे रद्दबातल झाले.
साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले असून परिषदेचे प्रमुख पदाधिकारी हेच महामंडळाचे पदाधिकारी झाले आहेत. महामंडळ पदाधिकाऱ्यांची मुदत मार्चमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात विश्व साहित्य संमेलन घेण्यासाठीचा चंग बांधला आहे. अंदमान येथे विश्व साहित्य संमेलन घेण्यासाठी शिवसंघ प्रतिष्ठान आणि ‘ऑफबीट’ ही प्रवासी संस्था अशी दोन निमंत्रणे आली आहेत. या संमेलनासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचे अर्थसाह्य़ मिळाले नाही तरी संमेलन यशस्वी करून दाखवू, असा विश्वास या दोन्ही संयोजकांनी व्यक्त केला आहे.
सरकारकडून अर्थसाह्य़ मिळणार नसल्याने संमेलनाला येणाऱ्या सर्वानी प्रवास आणि निवासाचा खर्च उचलावा अशी अपेक्षा व्यक्त करताना, या संमेलनातील भोजनव्यवस्था आणि उत्तम कार्यक्रम देण्याची जबाबदारी शिवसंघ प्रतिष्ठानने उचलली आहे. तर, संमेलनासाठी काही प्रायोजक मिळविणाऱ्या ऑफबीट संस्थेला अंदमान येथील महाराष्ट्र मंडळाचेही सहकार्य लाभले आहे. साहित्य महामंडळाची गुरुवारी पुण्यात बैठक होत असून त्यामध्ये ऑफबीट संस्थेला हिरवा कंदील मिळेल, अशी शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संमेलनाचे अध्यक्ष कोण?
अंदमान येथे विश्व साहित्य संमेलन झाले तर या संमेलनाचे अध्यक्ष कोण, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची टोरँटो येथे होणाऱ्या संमेलनासाठी अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, हे संमेलन रद्द झाल्यामुळे त्यांचे अध्यक्षपद आपोआप संपुष्टात आले असा एक मतप्रवाह आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे हारतुरे स्वीकारू नयेत अशी भावना व्यक्त करीत महानोर यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाला नम्रपणे नकार दिला होता. मात्र, संमेलन कोठेही झाले तरी महानोर यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे यासाठी त्यांना विनंती करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, असेही या सूत्राने सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwa sahitya sammelan at andamaan
First published on: 01-07-2015 at 03:15 IST