अनेक नागरिकांची मतदार यादीत नावे नसल्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ झाला. नागरिकांना मतदान न करता आल्यामुळे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊन त्याला पोलिसांनाच तोंड द्यावे लागते. मतदार याद्यांमधील नावांच्याा घोळासंदर्भात सखोल अभ्यास होण्याची गरज आहे, असे मत पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी व्यक्त केले.
मतदानात वाढ व्हावी, म्हणून नागरिकांना मतदानाचे एकीकडे आवाहन करीत आहोत. मात्र, दुसरीकडे नागरिकांना मतदान करायचे असताना देखील त्यांची नावे यादीत नसल्यामुळे गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही परिस्थिती पोलिसांनाच हाताळावी लागते. येत्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मतदार यादीमध्ये नागरिकांची नावे नसल्याप्रकरणी सखोल अभ्यास होण्याची आवश्यकता आहे, असे माथूर यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त मतदानापासून वंचित
पोलीस आयुक्त सतीश माथूर यांची पुण्यात बदली झाल्यानंतर त्यांनी मार्च महिन्यात बिशप स्कूलमध्ये मतदार यादीत त्यांच्या नावाची नोंद केली होती. मात्र, त्यांचे मतदार यादीत नाव आले नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यांनी अर्ज क्रमांक सहा भरून दिला, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.