पुणे : कारागृहातील विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगणारे कैदी, तसेच कच्च्या कैद्यांची (न्यायाधीन बंदी) भेट घेण्यासाठी नातेवाइकांची गर्दी होते. राज्यातील सर्वांत मोठे कारागृह अशी ओळख असलेल्या येरवड्यातील कारागृहाबाहेर नातेवाइकांची अक्षरश: झुंबड उडालेली असते. कारागृहाबाहेर तिष्ठत थांबणाऱ्या नातेवाइकांसाठी आता येरवडा कारागृहाच्या परिसरात अत्याधुनिक प्रतीक्षालय साकारण्यात आले आहे. या प्रतीक्षालयात एकावेळी दीड हजार नातेवाईक थांबू शकतात. येरवडा कारागृहातील प्रतीक्षालय हे राज्यातील सर्वांत मोठे प्रतीक्षालय ठरले आहे.

‘सायबेज फाउंडेशन’ने हे प्रतीक्षालय बांधण्यासाठी कारागृह प्रशासनाला सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) भरीव आर्थिक मदत केली आहे. यापूर्वी कारागृहाच्या परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी पाळणाघर, तसेच विविध सुविधांसाठी ‘सायबेज फाउंडेशन’कडून मदत करण्यात आली आहे. येरवडा कारागृहातील प्रतीक्षालयात संगणकीकृत नोंदणी कक्ष आहे. या कक्षात कैद्यांची भेट घेणारे नातेवाईक नाेंदणी करू शकतात. या प्रतीक्षालयाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. या वेळी कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सायबेज साॅफ्टवेअर प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी, ‘सायबेज फाउंडेशन’च्या प्रमुख रितू नथानी, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, उपअधीक्षक पल्लवी कदम या वेळी उपस्थित होते.

‘सायबेज फाउंडेशन’कडून ग्रामीण भागातील विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. कारागृहातील बंदी, त्यांच्या नातेवाइकांसाठी यापूर्वी विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. कैद्यांची भेट घेण्यासाठी येणारे नातेवाईक कारागृहासमोरील मोकळ्या जागेत थांबायचे, ही बाब माझ्या लक्षात आली. त्यानंतर कैद्यांच्या मुलाखतीसाठी येणाऱ्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षालय बांधण्यासाठी आम्ही कारागृह प्रशासनाकडे परवानगी मागितली. कारागृह प्रशासनाने होकार दिल्यानंतर १४ महिन्यांत हे प्रतीक्षालय बांधून पूर्ण झाले. प्रतीक्षालयात एक हजारपेक्षा जास्त नातेवाईक थांबू शकतात. त्यांच्यासाठी आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, छोटे उपाहारगृह असणार आहे. मुलाखत कक्षात जाण्यासाठी प्रतीक्षालयातून मार्ग करण्यात आला आहे, असे नथानी यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्याधुनिक प्रतीक्षालय बांधण्यात आले आहे. या कक्षात कैद्यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या वकिलांसाठी विशेष कक्ष असणार आहे, असे त्यांनी नमूद केले.