मुंबई क्रूझ छापा प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) “स्वतंत्र साक्षीदार” म्हणून नमूद केलेला खासगी गुप्तहेर, वॉन्टेड आरोपी किरण गोसावीची सहाय्यक शेरबानो कुरेशी हिला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबतचा गोसावीचा सेल्फी चांगलाच व्हायरल झाला. तो एनसीबीचा अधिकारी असल्याचंही बोललं जात होतं. मात्र, त्यानंतर तो खासगी गुप्तहेर असल्याचा खुलासा झाला.

एनसीबीने क्रूझ जहाज छाप्यादरम्यान ताब्यात घेतल्यानंतर गोसावीचे नाव मुंबई, पुणे आणि ठाण्यात फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये आले आहे. २०१८ मध्ये पुण्यातल्या फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात तो एक वॉन्टेड आरोपी आहे.

१३ ऑक्टोबर रोजी पुणे शहर पोलिसांनी गोसावीला देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी त्याच्याविरोधात लुक-आउट परिपत्रक जारी केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल झाल्यावर सुरुवातीला गोसावीची सहाय्यक कुरेशी (२७) हिचे नाव आरोपी म्हणून नव्हते. परंतु त्यांच्या चौकशीत या प्रकरणात तिच्या सहभागाची पुष्टी झाली. कुरेशी ही मुंबईतील गोवंडी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – एनसीबी अधिकाऱ्यानेच आर्यन खानसोबत फोटो काढल्याचा दावा, व्हायरल फोटोमागील सत्य काय?

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे म्हणाले, “फसवणूक प्रकरणातील पैसे कुरेशीच्या बँक खात्यात हस्तांतरित केल्याचे तपासात उघड झाले. गुन्हा घडला त्या वेळी तिने गोसावीची सहाय्यक म्हणून काम केले. तिला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी न्यायालयाने तिला २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ”

गोसावीची फसवणुकीच्या आणखी तीन प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून नोंद आहे, ज्यात २००७ मध्ये मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात आणि २०१५ व २०१६ मध्ये ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यातील दोन प्रकरणांचा समावेश होता.