पुणे : दिवसाचे कमाल तापमान सध्या बहुतांश भागात सरासरीच्या आसपास असले, तरी रात्रीच्या किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने रात्रीचा उकाडय़ाने राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या अंशत: ढगाळ वातावरणामुळे ही स्थिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्चच्या सुरुवातीच्या पंधरवडय़ातच राज्याला उन्हाच्या चटक्याने हैराण केले. मुंबई परिसरासह कोकण विभाग आणि त्यानंतर विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेची लाट आली होती. त्यानंतर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात मध्यंतरी पावसाळी वातावरण निर्माण झाले होते.

राज्यातील पावसाळी वातावरण दूर होऊन पुढील चोवीस तासांत सर्वत्र कोरडे हवामान होणार आहे. देशात सुरुवातीला २७ मार्चला राजस्थानपासून उष्णतेची लाट सुरू होणार आहे. त्यानंतर गुजरात, मध्य प्रदेशापर्यंत उष्णतेची लाट येणार आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भात २८ ते ३० मार्च या कालावधीत अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यामध्ये दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 किमान तापमानाचा उच्चांक

राज्यात सध्या विविध भागात रात्रीच्या किमान तापमानाचा उच्चांक नोंदविला जात आहे. त्यामुळे रात्री मोठय़ा प्रमाणावर उकाडा जाणवतो आहे. रात्री बहुतांश भागात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने किमान तापमानात वाढ होत आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आदी भागांत किमान तापमान २२ ते २४ अंश जे सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी अधिक आहे. मुंबई परिसरात ते २५ अंशांपुढे आहे. मराठवाडा आणि विदर्भातही रात्री चांगलाच उकाडा असून, या भागांत २४ ते २६ अंशांच्या पुढे आणि सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी अधिक असे रात्रीचे किमान तापमान नोंदिवले जात आहे.

तापभान.. उत्तरेकडे आता उष्णतेच्या लाटेचे वातावरण निर्माण होणार आहे. त्याचा परिणाम राज्यावर होणार असून, येत्या दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, उर्वरित महाराष्ट्रातील दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पावसाळी स्थिती..

गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात अंशत: ढगाळ वातावरण किंवा पावसाळी स्थिती निर्माण होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning of heat wave in vidarbha state harassment akp
First published on: 27-03-2022 at 01:48 IST