पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीपात्रात पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ भराव टाकून राडाराेडा टाकत अतिक्रमण केले आहे. महापालिकेने तत्काळ हे अतिक्रमण काढून घ्यावे, अशी सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पर्यावरण विभागाला केली आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीचा सुधार प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी मुळा नदीकाठावरील झाडे तोडली जात आहे. नदीचे पात्र अरुंद केले जात असल्याचा आक्षेप घेत पर्यावरणप्रेमींकडून काही दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. त्यातच जलसंपदा विभागानेही महापालिकेला नोटीस पाठविली आहे. त्यात म्हटले आहे की, मुळा नदीपात्रात पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ भराव टाकून राडाराेडा टाकला आहे. नदीच्या क्षेत्रामधील जागेत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. भराव करून नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिक्रमण व नदीमध्ये केलेला भराव ताबडतोब स्वखर्चाने काढून टाकावा. नदीची जागा पूर्व स्थितीत करून द्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खडकवासला कालवा उपविभागाचे सहायक अभियंता रा. बा. गव्हाणकर यांनी दिला आहे. जलसंपदा विभागाने मान्यता दिल्याप्रमाणे नदीसुधारचे काम सुरू आहे. महापालिका त्यात कोणताही बदल करत नसल्याचे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.